इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा
शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण संदर्भात भूमिका स्पष्ट करणेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई येथे तातडीची बैठक बोलविली आहे. आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून ही बैठक होत आहे.
गेली 35 वर्षे नांदणी येथील मठात असणार्या महादेवी हत्तीणीला पेटा या संस्थेच्या माध्यमातून जामनगर गुजरात येथील वनतारा याठिकाणी पाठविण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वच स्तरातून तीव्र भावना व्यक्त होत असून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने छेडली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी या संदर्भात चर्चा करणेसाठी सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी जिल्ह्यातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार विनय कोरे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार अमल महाडीक, आमदार विश्वजित कदम, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोक माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, आप्पासो भगाटे, सागर पाटील, अॅड. मनोज पाटील आदी उपस्थित असणार आहे. या बैठकीत निश्चितपणे योग्य तो मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.
