अमरावती / महान कार्य वृत्तसेवा
शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनी इथं उघडकीस आली. आशा राहुल धुळे (तायडे), असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसाची हत्या करण्यात आली, तेव्हा महिलेचा पती मुलांना घेऊन बाहेर गेलेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशी आहे घटना : आशा धुळे (तायडे) या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांचे पती राहुल धुळे हे राज्य राखीव पोलीस दल क्र. 9 मध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. गेल्या 13 तारखेपासून आशा धुळे (तायडे) या रजेवर होत्या. त्यांना चौदा वर्षाचा एक मुलगा तर सात वर्षाची एक मुलगी आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास त्या घरात एकट्या होत्या. पती, मुलगी व मुलगा बाहेर होते. मुलगा सायंकाळी सहा वाजता घरात जात असताना त्यांच्या घरातून दोन व्यक्ती बाहेर येत असल्याचं त्याला दिसले. यानंतर त्यानं घरात प्रवेश केला असता, त्याची आई बिछान्यावर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यानं आईला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु आईनं प्रतिसाद दिला नाही. यामुळे घाबरलेल्या मुलानं तत्काळ वडिलांना माहिती दिली. शेजाऱ्यांना देखील घटनेची माहिती देण्यात आली. काही मिनीटातच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी मोठी गर्दी उसळली. पोलिसांना माहिती मिळताच फ्रेजरपुरा ठाणेदार रोशन शिरसाट घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळं गुरुकृपा कॉलनीसह शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त पोहोलेत घटनास्थळी : पोलीस कर्मचारी महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस येताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे कुटुंबीयांचा आक्रोश परिसरात ऐकू येत होता. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.
