लंडन / महान कार्य वृत्तसेवा
जर एखाद्या फलंदाजानं एका षटकाच्या सर्व सहा चेंडूंवर सहा षटकार मारले तरी धावसंख्या 36 धावाच राहील, पण जर एखाद्या गोलंदाजाचा दिवस वाईट गेला तर काहीही होऊ शकते. याची झलक अलिकडेच अफगाणिस्तानच्या एका फलंदाजानं एका षटकात 45 धावा केल्या तेव्हा दिसून आली. हा एक जागतिक विक्रम झाला आहे.
एका षटकात ठोकल्या 45 धावा : अफगाणिस्तानच्या उस्मान घनीनं ईसीएस टी-10 लीगमध्ये लंडन काउंटी क्रिकेटसाठी खळबळ उडवून दिली. या डावखुऱ्या फलंदाजानं आपल्या वेगवान खेळानं एकाच षटकात 45 धावा केल्या. यासह उस्माननं एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वी व्यावसायिक क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजानं एका षटकात 45 धावा केल्या नव्हत्या. गिल्डफफोर्डविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात उस्मान घनीनं लंडन काउंटीकडून 43 चेंडूत 153 धावांची नाबाद खेळी केली. या डावात उस्माननं 17 षटकार आणि 11 चौकारही मारले.
लंडन संघाचा धावांचा डोंगर : उस्मानच्या या स्फोटक फलंदाजीमुळं लंडन काउंटीनं 10 षटकात 226 धावांचा मोठा स्कोअर केला. उस्माननं ज्या गोलंदाजाविरुद्ध एका षटकात इतक्या धावा केल्या तो विल एर्नी आहे. विलनं त्याच्या 2 षटकांत 64 धावा दिल्या. उस्माननं 45 धावा काढलेल्या विलच्या षटकात त्यानं 5 षटकार आणि 3 चौकार मारले. विलनं त्याच्या षटकात दोन नो बॉल आणि दोन वाइड बॉल टाकले, ज्यावर उस्माननं चौकार मारला. अशा प्रकारे उस्माननं विलला चकमा दिला. उस्मान व्यतिरिक्त, इस्माइल बहरामानीनंही 19 चेंडूत 61 धावांची स्फोटक खेळी केली. इस्माइलनंही त्याच्या डावात 5 षटकार आणि 7 चौकार मारले.
लंडन काउंटीचा जबरदस्त विजय : लंडन काउंटीच्या या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात, गिल्डफफोर्डचा संघ कुठंही टिकू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना, गिल्डफफोर्डचा संघ 10 षटकांत 4 गडी गमावून फक्त 155 धावा करु शकला. अशा प्रकारे, लंडनचा संघ 71 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला. गिल्डफफोर्डची स्थिती अशी होती की ते उस्मान घनीच्या वैयक्तिक धावसंख्येपेक्षा फक्त 2 धावा जास्त करु शकले. उस्मान घनी कोण आहे? : 28 वर्षीय उस्मान घनी हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. उस्माननं अफगाणिस्तानसाठी 17 वनडे आणि 35 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये उस्माननं 2 अर्धशतकं आणि 1 शतकासह 435 धावा केल्या आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 786 धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यानं 4 अर्धशतकं केली आहेत.
