मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला लागून असलेल्या उपनगरांमधून मुख्य शहरात येण्यासाठी नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या काही प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे. सध्या गोरेगाव ते मुलुंड दरम्यान सुमारे 12.20 किलोमीटर लांबीचा जोडरस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या प्रकल्पामुळे मुंबईतील पूर्व व पश्चिम उपनगरे जोडली जातील. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जुळे बोगदे बांधले जाणार आहेत. बोगदे बांधणीच्या कामासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीतील 95 झाडे तोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या कामाला वेग येईल.
या कामासाठी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये शाफ्ट निर्माण करून टीबीएम जमिनीखाली उतरावे लागणार आहे. हा शाफ्ट खणण्यासाठी परिसरातील 95 झाडे तोडण्याची मुंबई महानगरपालिकेने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. तत्कालीन मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर महानगरपालिकेने ही मागणी केली होती. पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल राखणे गरजेचं आहे. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाने मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीवर विचार करावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
एकूण चार टप्प्यांमध्ये हा जोडरस्ता बांधला जाणार आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 4.7 किलोमीटर अंतराचे आणि 45.70 मीटर रुंदीचे दोन बोगदे बांधले जाणार आहेत.
या संपूर्ण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. शिवाय, नागरिकांचे इंधन आणि वेळ दोन्हींची बचत होईल. पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानच्या प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येणार आहे. तसेच, कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे 22 हजार 400 टन इतकी घट होणार आहे.
