Spread the love

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा

दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो हे खर असले तरी, मालेगाव येथील 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा नवीन शब्द प्रचलित झाला होता. आज लागलेल्या न्यायालयाच्या निकालानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना संघ भूमीतून यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अनेक स्वयंसेवकांनी या निकालावर आनंद व्यक्त केला आहे. तसेच हिंदू दहशतवाद ही केवळ काँग्रेसने हिंदूंना बदनाम करण्यासाठी उठवलेली अफवा असल्याचा आरोप केला आहे.

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.

बॉम्बस्फोट झाला, मात्र मोटोरसायकलमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटाईसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटारसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केले.

प्रदीर्घ काळानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींवर दहशतवादाच्या आरोपांतर्गत आरोपनिश्चिती केली आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला अखेर सुरुवात झाली. सात वर्षांच्या सुनावणीनंतर 19 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने गुरूवारी उपरोक्त निकाल दिला. खटला सुरू असताना प्रकरणातील सगळ्या आरोपींना उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे, सगळे आरोपी जामिनावर बाहेर होते. निकालानंतर सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे. यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ स्वयंसेवकांने सांगितले की, हा निकाल आनंददायक आहे. तसेच देशातील हिंदूंना बदनाम करण्यासाठी केलेल्या जो प्रयत्न झाला होता, त्यांना धडा शिकवणारी ही घटना आहे असेही ते म्हणाले.