Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षांनी विशेष एनआयए कोर्टानं निकाल सुनावला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. भोपाळच्या माजी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपींची विशेष एनआयए कोर्टानं सुटका केली आहे. तसंच पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आतंकवाद भगवा न कभी था, ना है…: काही राजकीय मंडळींनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भगवा दहशतवाद असा उल्लेख केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर एक्सवर ट्विट केलं आहे. यामध्ये ”आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, ठाकूर आणि पुरोहितसह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या एनआयए कोर्टाच्या निर्णयाचं शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी स्वागत केलं आहे. ”आम्हाला या आदेशानं खूप आनंद झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या भयानक युक्तीनं त्यांना अडकवलं आणि त्यांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दही तयार केला. त्यांचा पर्दाफाश झाला आहे,” असा दावा कृष्णा हेगडे यांनी केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या निकालावर भाष्य करण्यास नकार दिला. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या निकालाचं स्वागत केलं आहे. तसंच ”हिंदुत्वाला ‘दहशतवादी’ असं लेबल लावण्यात आलं. त्यामुळं भावना दुखावल्या गेल्या, ” असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

एनआयए कोर्टानं काय म्हटलं? : दरम्यान, 29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील मालेगाव शहर बॉम्बस्फोटांनी हादरले होते. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा निर्णय 17 वर्षांनी आला असून, सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भोपाळच्या माजी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सात आरोपींची विशेष एनआयए कोर्टानं सुटका केली आहे. तसंच पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. दहशतवादाला कोणताही रंग किंवा धर्म नसतो, असंही न्यायालयानं अधोरेखित केलं आहे. एनआयए कोर्टानं म्हटले आहे की, मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केलं, परंतु बाईकमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरलेत.

कोण आहेत आरोपी? – या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसी कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला होता. तर श्याम साहू, प्रवीण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना यात फरार आरोपी दाखवण्यात आलं होतं. कसा राहिला खटल्याचा प्रवास? – एनआयएच्या विनंतीनुसार विशेष एनआयए कोर्टानं वर्ष 2017 मध्ये मकोकाला या खटल्यातून वगळण्याचं मान्य केलं. मात्र साध्वी प्रज्ञासिंहसह अन्य सहा आरोपींविरोधात खटला सुरूच राहील, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये मुंबई सत्र न्यायालयात या खटल्याला सुरुवात झाली होती. सरकारी पक्षानं याप्रकरणी 100 हून अधिक प्रत्यक्ष साक्षीदार तपासले जे यात जखमी झाले होते, तर काहींनी आपल्या नातेवाईकांना यात गमावलं होतं. याप्रकरणी एकूण 323 साक्षीदार तपासण्यात आलेत. ज्यातील 34 जणांनी कोर्टात आपली साक्ष फिरवल्यानं त्यांना फितूर घोषित करण्यात आलं होतं. हा खटला गेली 17 वर्षं प्रलंबित असल्यानं यापैकी एकूण 30 साक्षीदारांचा या निकालापूर्वीच मृत्यू झाला होता. फितूर झालेल्यांपैकी अनेकांनी एटीएसनं आपल्याकडून जबरदस्तीनं जबाब लिहून घेतल्याचं कोर्टाला सांगितलं होतं. सप्टेंबर 2023 मध्ये सर्व साक्षी पुराव्यांची नोंद करत कोर्टान दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकण्यास सुरुवात केली.