मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी स्टारर ‘फुलवंती’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा चित्रपट बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित आहे. ‘फुलवंती’मध्ये पेशवेकालीन कथा दाखविण्यात आली आहे. फुलवंती, एक नृत्यांगना आणि व्यंकट शास्त्री, एक पेशवे पंडित यांच्यातील प्रेम आणि संघर्ष यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीनं फुलवंती आणि गश्मीर महाजनी व्यंकट शास्त्री यांच्या भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा हा चित्रपट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना झी टॉकिजवर पाहायला मिळेल.
‘फुलवंती’ चित्रपट कधी पाहू शकणार : हा चित्रपट रविवारी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता हा चित्रपट तुम्ही घरी बसून पाहून आपले मनोरंजन करू शकता. या चित्रपटामध्ये प्राचीन काळातील सुंदर दृष्य आणि प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘फुलवंती’ चित्रपटाला समीक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिली होती. तसेच या चित्रपटात अनेक सुंदर गाणी आणि त्यावर प्राजक्ता माळीचं आकर्षक नृत्य आहे. दरम्यान या चित्रपटासाठी प्राजक्ता माळीचं खूप कौतुक झालं होतं. तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल तरडे यांनी केलं होतं. या चित्रपटाचे निर्माते प्राजक्ता माळी, श्वेता माळी, मंगेश पवार, अभिषेक पाठक, कुमार मंगत पाठक हे आहेत. ‘फुलवंती’ आणि ‘येक नंबर’ची झाली होती तुलना : या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन अविनाश विश्वजीत यांनी केलं आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाचा रनटाईम हा 2 तास 14 मिनिटांचा आहे. दरम्यान ‘फुलवंती’ आणि ‘येक नंबर’ या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईची तुलना करण्यात आली होती. ‘फुलवंती’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई केली नव्हती. हा चित्रपट लोकांना आकर्षित करू शकला नाही.
