नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 7 वा दिवस आहे. आजही ‘ऑपरेशन सिंदूर’वर व्यापक चर्चा सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या चर्चेत भाग घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बिहारमधील मतदार यादी एसआयआर मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे खासदार सभागृहात अनब रस्त्यावर सरकारविरोधात निषेध करीत आहेत. मान्सून सत्र सुरू झाल्यानंतरच विरोधी खासदारांचे सभागृहाच्या बाहेर निषेध सुरूच आहेत. संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनं नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय. परंतु या दरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड झालेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससाठी सिंदूरवरची ही चर्चा आता डोकेदुखी ठरत आहे.
विरोधी पक्षांच्या गोटातील अंतर्गत मतभेद उघडकीस : एकीकडे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या शांततेने प्रश्न उपस्थित केलेत, दुसरीकडे खासदार मनीष तिवारी यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टने काँग्रेसला अडचणीत आणले आहे. या पोस्टने भाजपाला एक नवीन शस्त्र दिले आहे, जे विरोधी पक्षांच्या गोटातील अंतर्गत मतभेद उघडकीस आणत आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये 1970 च्या सिनेमातील ‘पुरब आणि पश्चिम’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे होते, ”है प्रीत जहान की रीत सदा, मै गीत वहा के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं! जय हिंद!, असं त्यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या जागतिक मुत्सद्देगिरीसाठी परदेशात गेलेल्या शिष्टमंडळात शशी थरूर, मनीष तिवारी आणि फतेहगड साहिबचे खासदार अमर सिंग यांचा समावेश होता, परंतु यापैकी कोणाचीही ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत बोलर्णायांच्या यादीत नावं नाहीत. पक्ष हे देशाला सुधारण्याचे एक साधन : अनुभवी नेते आनंद शर्मा आणि सलमान खुर्शीद हे देखील प्रतिनिधीमंडळाचे एक भाग होते, परंतु ते सध्या खासदार नाहीत. संसदेत वादविवाद सुरू झाल्यावर थरूर यांचे नाव यादीतून वगळल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर थरूर यांच्या वक्तव्यांनी काँग्रेसच्या नेतृत्व आणि त्यांच्यातील तणाव वाढला होता. थरूर यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांची पहिली निष्ठा ही देशाप्रति आहे. ”पक्ष हे देशाला सुधारण्याचे एक साधन आहेत. माझ्यासाठी पक्ष काय आहे हे महत्त्वाचे नाही, त्याचे उद्दिष्ट म्हणजे स्वत: च्या मार्गाने चांगला भारत घडविणे आहे, असंही शशी थरूर म्हणालेत. काँग्रेसच्या या अंतर्गत गोंधळामुळे भाजपाला हल्ला करण्याची संधी मिळालीय. भाजपाचे ज्येष्ठ नेते बैजयंत जय पांडा यांनी टीका केली, ”काँग्रेसमधील बरेच नेते चांगले बोलू शकतात. माझा मित्र शशी थरूर जी, जे एक महान वक्ते आहेत, त्यांना त्यांचा पक्ष बोलू देत नाही.”
