Spread the love

धुळे / महान कार्य वृत्तसेवा

शिरपूरहून शिंदखेडाकडं जाणाऱ्या प्रवासी बसला मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दभाशी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असून, एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी भीषणता पाहता काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

भरधाव ट्रकची एसटीला धडक : धुळे इथून इंदोरकडं भरधाव वेगानं जाणाऱ्या एका ट्रकनं समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बसचा पुढील भाग पूर्णत: चुरडून गेला. या अपघातामुळं बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी जागीच खाली पडले, तर काहींना गंभीर मार लागला.

अपघातामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट : अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यातील काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मृत चिमुकलीची ओळख अद्याप पटलेली नाही. या अपघातामुळं स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. दभाशी गावातील नागरिकांनी यापूर्वीही टोल प्रशासनाकडं स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, प्रशासनानं त्याकडं दुर्लक्ष केल्यानंच आजचा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांचं आंदोलन : अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन छेडत सुमारे अर्धा तास महामार्ग पूर्णपणं ठप्प केला. या आंदोलनामुळं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं अपघातस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच नरडाणा आणि शिंदखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी बोलावलं. अखेर टोल प्रशासनानं लवकरच गतिरोधक बसवण्याचं आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन मागं घेतलं.

पोलिसांचा तपास सुरू : या अपघातामुळं दबाशी परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ आणि प्रवासी अद्यापही अपघाताच्या धक्क्‌‍यातून सावरलेले नाहीत. अपघातानंतर एसटी आणि ट्रक दोन्ही वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघाताचा पुढील तपास शिंदखेडा पोलीस करीत आहेत.