सातारा / महान कार्य वृत्तसेवा
कराडमधील कृष्णा नदीच्या पुलावरून तरुणीने उडी मारल्याची घटना समोर आली असून, आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडालीय. सोमवारी रात्री साडे नऊच्या नदीत उडी घेऊन तरुणीनं आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय. लग्न ठरलेल्या आणि दोन दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुणीने कराडमधील कृष्णा नदीच्या पुलावरून थेट उडी मारल्याची घटना घडल्यानं स्थानिकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरत आहे. कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26, सध्या रा. वाखाण रोड, कराड, मूळ रा. जत, जि. सांगली), असं तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली असून, घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेनंतर काल रात्री पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तरुणी अजूनही बेपत्ता आहे.
दुचाकीवरून आली अनब नदीत मारली उडी : सोमवारी (28 जुलै) रात्री साडे नऊच्या सुमारास कल्पना वाघमारे ही तरुणी दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली. गाडी उभी करून ती मोबाईलवरून कोणाशी तरी बोलली. त्यानंतर तिने थेट नदीत उडी मारली. ही घटना पाहून आरडाओरडा केल्यानंतर वाहनधारकांची पुलावर मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती दिल्यानंतर कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुलावर तरुणीची दुचाकी आणि सॅक आढळून आली.
कुटुंबीय, नातेवाईकांची घटनास्थळी धाव : तरुणीशी लग्न ठरलेला मुलगा काही वेळातच घटनास्थळी पोहोचला. तसंच कुटुंबीय आणि नातेवाईकही आले. पोलिसांनी तरुणीची सॅक आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबीयांनी ओळखले. त्यानंतर तरुणीच्या आईने हंबरडा फोडला. वडिलांनाही जबर धक्का बसला. नातेवाईकांनी धीर देत तरुणीच्या आईला रूग्णालयात नेलं.
तरुणी करत होती खासगी नोकरी : कल्पना वाघमारे ही खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. सॅकमध्ये तिची पर्स, ओळखपत्र आणि इतर साहित्य आढळून आलं. त्यावरून कल्पनानेच नदीत उडी मारल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तातडीने एनडीआरएफ टीमला पाचारण केलं होतं. तसंच स्थानिक मच्छीमारही उपस्थित होते. मात्र, अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. आज सकाळी तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या सहकार्याने शोध कार्य सुरू : काल रात्री एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र, अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. आता नगरपालिकेच्या सहकार्याने शोध कार्य सुरू करणार आहोत. तरुणीने नदीत उडी का मारली, त्यामागील कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिलीय.
