Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए. पी. अबुबकर मुसलियार यांच्या कार्यालयाने सोमवारी (28 जुलै) एक महत्त्वाची घोषणा केली. 2017 साली येमेनमध्ये झालेल्या खून प्रकरणात दोषी ठरलेली भारतातील केरळची परिचारिका निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा येमेनी अधिकाऱ्यांनी पूर्णत: रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. ”यापूर्वी तात्पुरती स्थगित केलेली निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा, येमेनची राजधानी सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रद्द करण्यात आली आहे,” असे ग्रँड मुफ्ती यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तथापि, या निर्णयाबाबत अद्याप येमेनी सरकारकडून अधिकृत लेखी पुष्टी मिळालेली नाही, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची अधिकृत पडताळणी केलेली नाही. निमिषा प्रियाची फाशी मूळत: 16 जुलै रोजी होणार होती. मात्र, ग्रँड मुफ्ती मुसलियार यांनी येमेनी अधिकाऱ्यांना थेट आवाहन करून दया दाखवण्याची विनंती केल्यानंतर, फाशी अंमलात येण्याच्या केवळ एक दिवस आधी ती थांबवण्यात आली.

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील 38 वर्षीय निमिषा प्रिया 2008 मध्ये चांगल्या नोकरीच्या संधीसाठी येमेनला गेली. प्रशिक्षित नर्स असलेल्या निमिषाने येमेनचा नागरिक तलाल अब्दो महदी याच्यासोबत व्यावसायिक भागीदारी करून सना या राजधानीत एकत्रितपणे क्लिनिक सुरू केले. काही काळानंतर महदीने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्याने तिचा पती असल्याचा खोटा दावा करत तिचा पासपोर्टही ताब्यात घेतला. 2007 साली तिची कागदपत्रे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना, प्रियाने महदीला भूल देणारे औषध दिले. मात्र, या औषधाच्या ओव्हरडोसमुळे महदीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला.

2018 साली निमिषाला अटक करण्यात आली आणि खूनाच्या आरोपाखाली ती दोषी ठरली. 2020 मध्ये येमेनी न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. येमेनी राष्ट्राध्यक्ष रशाद अल-अलिमी आणि हौथी नेते महदी अल-मशत यांनी अनुक्रमे 2024 च्या अखेरीस आणि 2025 च्या सुरुवातीस निमिषाच्या फाशीला मान्यता दिली होती. मात्र, भारत सरकार आणि धार्मिक नेत्यांच्या सततच्या राजनैतिक हस्तक्षेपामुळे ही शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती.