Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुण्यातील रेव्ह पार्टीवर 27 जुलै रोजी पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि. 29) एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अनब माहिती कशी जाते? असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकलाय.

पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे म्हणाले की, मला पोलीसांना विचारायचे आहे की, याला रेव्ह पार्टी म्हणायचे का? रेव्ह पार्टीची व्याख्या काय? पोलीस बदनामी करतायत. तिथे ना डान्स ना म्युझिक आहे. पोलिसांनी खाजगी ठिकाणी असलेल्या लोकांचे व्हिडीओ शूट करुन ते माध्यमांना पुरवले. हा बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. प्रांजल खेवलकरांचा अल्कोहोलचा रिपोर्ट मिडियाकडे कसा जातो? तो आम्हाला का मिळत नाही? अंमली पदार्थांचा रिपोर्ट का समोर येत नाही? ससून रुग्णालयाचा अहवाल बदलला जाण्याची भीती आहे. कारण ससूनचे मागील काही काळातील रेकॉर्ड तसे आहे.

प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवण्याचे कारण काय?

माझ्या जावयाने मला सांगितलं की, मी आयुष्यात कधीही ड्रग्ज घेतलेले नाही, आताही घेतलेले नाही. वैद्यकीय अहवालात या गोष्टी समजतील. पण तो रिपोर्ट अजून का येत नाही, यामध्ये संशय घ्यायला जागा आहे. माझ्या जावयाने सांगितलं की, माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ते दोन-तीन ठिकाणी गेले तिथे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. सिव्हिल ड्रेसमधील पोलीस त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. त्याचे व्हिडीओ आहेत. पोलिसांना प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण आहे? ज्या हॉटेलमध्ये हे सगळे गेले होते, तिकडेही पोलीस रात्री 1 ते 2.30 च्या दरम्यान आले. या हॉटेलच्या पार्किंगमधील व्हिडिओ कॅमेऱ्यात सिव्हिल ड्रेसमधील पोलीस दिसत आहेत. त्याच पोलिसांनी छापा टाकला. हा प्रकार संशयास्पद आहे.

प्लॅन करुन कोणी कारवाई करत असेल तर…

पोलीस इतकी तत्परता दाखवतात की, लगेच पत्रकार परिषद आणि व्हिडीओ दाखवतात. एवढी तत्परता प्रफुल लोढा जो हनी ट्रॅपमध्ये अडकलेला आहे, बलात्कारात अडकलेला आहे, ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केले आहे, यासंदर्भात पोलीस यंत्रणा पुढाकार घेऊन जनतेला का माहिती देत नाही? पोलीस यंत्रणेने खडसेंना कशा रितीने बदनाम करायचे, हा प्लॅन आखलेला दिसत आहे. वारंवार खडसेंचे जावई दाखवले जात आहे. सत्य असेल तर कारवाई करायला माझी हरकत नाही. पण प्लॅन करुन कोणी कारवाई करत असेल तर योग्य नाही. सरकारने याचे उत्तर दिले पाहिजे. पोलीस कारवाईतील फोटो आणि व्हिडीओ कसे बाहेर आले, असा सवाल खडसे यांनी विचारला.

पुणे पोलिसांविरोधात बदनामीचा दावा दाखल करणार

मी कोणत्या मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांवर आता आरोप करणार नाही. पण, पोलीस कोणाच्या सांगण्यावरुन काम करतायेत, असे वाटते. ससूनला आम्ही पत्र दिले आहे की, जेव्हापासून या प्रकरणात कारवाई सुरु झालीय, त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज मिळावेत. जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो आणि माहिती कशी जाते? मी पुणे पोलिसांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार आहे, असे म्हणत त्यांनी पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकलाय.