बारामती / महान कार्य वृत्तसेवा
पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात रविवारी सकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती. बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. तिघेही जण दुचाकीने जात असताना एका डम्परने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलं आणि त्यांच्या वडिलांचा समावेश होता.
ओंकार आचार्य असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव होतं. ओंकार यांच्यासोबत त्यांची चार वर्षांची मधुरा आणि दहा वर्षांची सई यांचाही मृत्यू झाला. खंडोबा नगर परिसरात राहणाऱ्या या कुटुंतील तिघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या मृत्यूने बारामती शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. सायंकाळी साडेसात वाजता तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
ही घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज पहाटे ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचं देखील निधन झाले आहे. दोन नाती आणि मुलाच्या निधनाचा धक्का बसल्याने राजेंद्र यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र आचार्य हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अपघाताची घटना घडण्याच्या आदल्या रात्री म्हणजेच शनिवारी रात्री राजेंद्र यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, अशात रविवारी अपघातात मुलाचा आणि दोन नातींचा मृत्यू झाल्याचं त्यांना समजल्यानंतर याचा प्रचंड मानसिक धक्का त्यांना बसला. यानंतर सोमवारी पहाटे राजेंद्र आचार्य यांनी अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. अवघ्या 24 तासांत आचार्य कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे करून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
