जालना / महान कार्य वृत्तसेवा
राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. जालन्यात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता गोरंट्याल यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर सध्या सस्पेन्स कायम आहे. भाजपमध्ये प्रवेशाची जोरदार चर्चा असतानाही, हा निर्णय सध्या लांबणीवर टाकण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपकडून ‘शत प्रतिशत’साठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी विरोधी बाकांवरील नेत्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडत आहे. मराठवाड्यातही भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. त्यातूनच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र, स्थानिक नेतृत्वाच्या हरकतीनंतर त्याला ब्रेक लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
50 टक्क्यांवरून वाद?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत 50 टक्के जागांवर तिकीट मिळावं, यासाठी गोरंट्याल आग्रही आहेत. मागील कार्यकाळात जालना महापालिकेवर गोरंट्याल यांची मजबूत पकड होती. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी ते मोठ्या ताकदीनं भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत.
स्थानिक पातळीवर विरोध…
भाजपच्या शहर पातळीवर गोरंट्याल यांचा प्रवेश अद्याप स्वीकारला गेलेला नाही. भाजपचे शहराध्यक्ष भास्कर दानवे आणि गोरंट्याल यांच्यात तिकीटवाटपावर एकमत झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मतभेदामुळे प्रवेश प्रक्रियेला ब्रेक लागला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, काल माजी आमदार गोरंट्याल यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक राजकारण, संभाव्य जागावाटप आणि भाजप प्रवेशासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
