Spread the love

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा

राज्य शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. मनीष नगर परिसरातील एका बिअर बारमध्ये तीन व्यक्ती शासकीय फाईलींसह बसून असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये त्यातील एकजण हातात दारूचा ग्लास घेत फाईल चाळताना दिसत आहे.

हा व्हिडीओ रविवारी (सुट्टीच्या दिवशी) दुपारच्या सुमारास बारमधील सीसीटीव्हीमधून काढल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ”महाराष्ट्र शासन” असा मथळा असलेल्या फाईली दिसून आल्या आहेत. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

सामान्यपणे शासकीय फाईल्स कार्यालयाच्या बाहेर नेण्यास बंदी असताना, त्या सुट्टीच्या दिवशी खासगी बारमध्ये कशा काय आल्या, हे मोठं गूढ आहे. फाईल नेणाऱ्या व्यक्ती कोण, कोणत्या खात्यातील आहेत, आणि नेमक्या कोणत्या विषयाशी संबंधित त्या कागदपत्रांचा संबंध आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र, एकूणच हा प्रकार धक्कादायक आणि गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहेत. दारूच्या बारमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या या ओव्हरटाइम बद्दल चौकशी करण्याची मागणी होत आहे. या मागे कोणते आर्थिक लागेबंध लपले आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, मनिषनगरमधील बारमध्ये दुपारी 3.30 च्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आले. त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फाईलींचा मोठा गठ्ठा सोबत आणला होता. टेबलवर बसल्यानंतर त्यांनी दारूची ऑर्डर दिली. त्यानंतर मद्याचे पेग रिचवत या फाइली तपासण्याचे काम सुरू झाले. मात्र, बारमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. त्याशिवाय, बारमध्ये असलेल्या काहींनी याचे चित्रीकरण केले. मात्र हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.