वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा
जगभरात विमान अपघाताबाबत प्रवाशांमध्ये चिंतेची स्थिती असताना अमेरिकेत मोठा विमान अपघात टळला आहे. शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यामुळे धावपट्टीवर आग आणि धूर पसरली. त्यामुळे विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाण घेण्याच्या काही सेकंद आधी लँडिंग गियरमध्ये आग लागल्यानं विमानतळावर खळबळ उडाली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननं (एफएए) अमेरिकन माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार केबिनमध्ये धूर भरल्यानंतर सर्व 173 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सना विमानातून बाहेर काढण्यात आले.
प्रवाशांना विमानातून काढलं बाहेर- शनिवारी दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास विमान धावपट्टीवर उड्डाणापूर्वी वेगानं जात होते. तेव्हा वैमानिकांना अचानक लँडिंग गियरमध्ये यांत्रिक बिघाड आढळला. त्यानंतर टेकऑफ ताबडतोब थांबवण्यात आलं. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी खबरदाराची उपाय म्हणून आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. अमेरिकेतील माध्यमाच्या माहितीनुसार विमानाच्या उड्डाणापूर्वी टायरमध्ये समस्या असल्याचं आधीच सांगण्यात आलं होते. विमान उड्डाण होण्यापूर्वी टायरमध्ये आग लागल्यानंतर धूर वाढू लागल्यानं विमानातील प्रवासी भयभीत झाले. प्रसंगावधान राखून क्रू मेंबरनं प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढलं. धूर पसरल्यानं उडाला एकच गोंधळ- अमेरिकेतील विमानतळावर झालेल्या गोंधळाचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये घाबरलेले प्रवासी आपत्कालीन दरवाज्यातून खाली सरकताना दिसत आहेत. तर विमानाच्या खाली असलेल्या भागाला आग लागल्यानं धूर झालेला व्हिडिओमध्ये दिसू येत आहे. डेन्व्हर अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि विमानतळ बचाव पथकांसह आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
