Spread the love

हरिद्वार (उत्तराखंड) / महान कार्य वृत्तसेवा

संपूर्ण देशात चारधाम यात्रेमुळे प्रसिद्ध झालेल्या हरिद्वारमधील मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे. शहरातील मानसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेक भाविक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोतवाली प्रभारी रितेश शाह यांनी मानसा देवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेची पुष्टी केली आहे. दुर्घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत 35 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंदिरातील दुर्घटनेवर घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात असल्याचं त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं आहे. हरिद्वारचे एसएसपी प्रमोद डोबाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. एसएसपी तसेच त्यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

जास्त गर्दी असूनही रस्ता केला खुला- हरिद्वार मानसा देवी मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी जमते. 23 जुलैला जलाभिषेक झाल्यानंतर लाखो कावडी आणि भाविक हरिद्वारला पोहोचले आहेत. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं हरिद्वारमध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे. अशातच यात्रेनिमित्त मंदिराजवळील रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. परंतु जास्त गर्दी असूनही आज भाविकांना या रस्त्यावरून पाठवले जात होते. दुर्घटनेचं कारण आलं समोर- मंदिराच्या मुख्य जिन्यावरील वॉकवेवर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत एसएसपी प्रमोद डोबाल म्हणाले, ”सकाळी 9 वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला मंदिरापासून 100 मीटर खाली असलेल्या जिन्यावरील वॉकवेवर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच एसडीआरएफ आणि पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांसह सर्व जखमींना वाचवण्यात आले. रस्त्यावर विजेचा धक्का लागल्याची अफवा पसरल्यानं चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली.