Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेण्यात आलंय. रेव्ह पार्टीतून सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रांजल हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत. प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेमुळे राजकीय वतुर्ळात एकच खळबळ उडाली.

आवाज दाबण्याचा प्रयत्न – सुषमा अंधारे : या घटनेवरुन सत्ताधारयांनी विरोधकांवर जोरदार टीका केली, तर विरोधकांनीही सावध भूमिका घेत सत्ताधारयांवर पलटवार केलाय. ”एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे तपास यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांच्यासाठी हा एक संदेश आहे, ‘चुपब बैठो, नही तो रेड करुंगा’,” असं म्हणत शिवसेना – उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली.

जावईबापूंना अलर्ट करायला हवं होतं : एकनाथ खडसे यांच्या जावयावर कारवाई झाल्यानंतर भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना खडसेंवर पलटवार केलाय. ”मी पंढरपूरमध्ये असल्यामुळं मला या प्रकरणाची फारशी माहिती नाही. मी टीव्हीवर पाहिलं की, खडसेंचे जावई रेव्ह पार्टीत सापडले आहेत आणि त्यांनीच ही पार्टी आयोजित केल्याचंही बातम्यात दाखवलं गेलं”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. ”जर ट्रॅप लावला जाणार आहे, याची कल्पना खडसेंना होती तर त्यांनी जावईबापूंना अलर्ट करायला हवं होतं,” असा खोचक टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.

भाजपा पक्षच रेव्ह पार्टी – संजय राऊत : एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टीमधून ताब्यात घेतल्याच्या वृत्ताबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ”एकनाथ खडसे हे नेहमीच भाजपावर तुटून पडतात. त्यांची किंमत एकनाथ खडसे यांची कुटुंब मोजत आहेत. भाजपा पक्षच रेव्ह पार्टी आहे,” अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. राजकीय षडयंत्र असेल तर चुकीचं – रोहित पवार : राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी रेव्ह पार्टीच्या कारवाईबाबत वेगळाच संशय व्यक्त केलाय. त्यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलं, ”पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईल. परंतु हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या एकनाथ खडसे कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना, हेही बघितलं पाहिजे. कुणी दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. परंतु हे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. हे राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर गेल्याचं लक्षण आहे.”