नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
आठव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावत सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी, ”भारताच्या शेजारील परिस्थिती पाहता अंतर्गत सुरक्षा आव्हानं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा, सतर्कता आणि समन्वय हे ब्रीदवाक्य स्वीकारलं पाहिजे,” असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मजबूत राजकीय इच्छाशक्ती : नवी दिल्ली इथल्या आठव्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेत (ऱ्एएणब ) समारोपीय भाषणात अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी, ”मजबूत राजकीय इच्छाशक्ती दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी ते जगाला दाखवून दिलं आहे.” यावेळी अमित शाह यांनी, ”राज्य पोलीस दल आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांना सुरक्षा, सतर्कता आणि समन्वय हे ब्रीदवाक्य स्वीकारावं,” असं आवाहन केलं.
भारत वेगानं उदयास येणारी अर्थव्यवस्था : मोदी सरकारनं विविध राज्यांमधील असंख्य समस्या सोडवल्या आहेत, असं अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं. ”भारत ही सर्वात वेगानं उदयास येणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यासोबतच देशासमोरील आव्हानंही वाढत आहेत. आपण अधिक सतर्क राहिलं पाहिजे. नागरिकांनी जागरूकतेनं समस्यांना तोंड दिलं पाहिजे,” असंही गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. ”सर्व राज्यांच्या आणि केंद्रीय तपास संस्थांच्या जवानांनी जगातील सर्वोत्तम बनण्याच्या ध्येयानं कार्य करत पुढं जावं. देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी रिअल-टाइम डेटा शेअरिंगसाठी एक विश्वासार्ह परिसंस्था स्थापित केली पाहिजे,” असं अमित शाहांनी यावेळी सांगितलं.
दहशतवादाला तगडा संदेश : सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता आणि समन्वय हा त्यांच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प आणि सहकारी नागरिकांच्या पाठिंब्यानं जगभरातील दहशतवादाला मजबूत संदेश दिला आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारत आता नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, हरित ऊर्जा आणि नवोपक्रमांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. भारताच्या वाढत्या दर्जामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांमध्ये वाढ होईल, यावरही त्यांनी भर दिला.
