Spread the love

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील विकासकामांना खिळ बसल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही पुरुषांनीही लाडक्या बहीण योजनेतील पैशांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ”मी जर राज्याचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखांचं अनुदान देईल,” असं वक्तव्य कोल्हापुरातील एका कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत माझा विचार वेगळा आहे : ”कर्जमाफी होणार अशी शक्यता निर्माण झाल्यास शेतकरी कर्ज भरत नाहीत, याचा फटका बँकांना बसतो. बँकांची आर्थिक परिस्थिती डबघाईला येते. सुदैवानं कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही. गतवर्षी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांनी 90 टक्के प्रमाणात कर्ज भरली होती. यंदा तो आकडा एक टक्क्‌‍यांनी वाढून 91 टक्क्‌‍यावर गेला,” असं मंत्री मुश्रीफ म्हणाले. ”प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे 38 हजार कोटी थकल्याचं मी ऐकलं आहे. त्यामुळे मी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे. जर मला तुम्ही संधी दिली तर मी मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाखांचं अनुदान देईल,” असं वक्तव्य कोल्हापुरातील कागलच्या वंदूर इथं झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

योजनांचा लाभ घेतला मात्र मतं मिळाली नाहीत : संजय गांधी निराधार योजनेसह बांधकाम कामगारांच्या योजनेचा मतदारसंघातील अनेकांनी लाभ घेतला. मात्र कागल तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही. याचा संदर्भ घेत भाषणात बोलताना मंत्री मश्रीफ म्हणाले, ”बांधकाम कामगारांसाठी असणारे भांड्यांचे किट तालुक्यात सर्वाधिक आले मात्र मतं मिळाली नाहीत. आता झालं गेलं गंगेला मिळालं, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकसंघ काम करा,” असं आवाहन मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे यांनी यावेळी केलं.

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आता सीएम पदावर डोळा? : विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान हसन मुश्रीफ यांनी मी उद्याचा उपमुख्यमंत्री आहे, मला मतदान करा, असं मतदारांना आवाहन केलं होतं. तर शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते, असा उल्लेख केला आहे. तर मतदार संघातील या कार्यक्रमात मला मुख्यमंत्री पदाची संधी दिल्यास शेतकऱ्यांना एक लाखांचे अनुदान देईन, असा उल्लेख करून नवं वादंग त्यांनी निर्माण केलं आहे. मंत्री हसन मुश्रीफांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे.

मुश्रीफ आणि घाटगे गटात सोशल मीडियावर रंगल ‘वॉर’ : विधानसभा निवडणुकीत 6 व्यांदा विजय मिळवल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांचा माजी आमदार संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना सत्कार करायचा होता. यासाठी हारतुरे आणले होते, मात्र मुश्रीफ गटाच्या एका ‘चाणक्य’ कार्यकर्त्यांनं हारच लपवून ठेवले. यामुळे संतापलेल्या संजय घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपला राग सोशल मीडिया ग्रूपवर व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच पदापर्यंत मंत्री हसन मुश्रीफांच्या आशीर्वादानं पदं भोगलेल्या या ‘चांगल्या’ कार्यकर्त्याला ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवण्याचा निर्धार केला आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांमधील वाद उफाळून आल्यास याचा थेट परिणाम निवडणुकीवर होणार आहे.