नांदेड / महान कार्य वृत्तसेवा
संततधार पावसामुळं नांदेड शहरातील विष्णुपुरी धरण 100 टक्के भरलं आहे. पाण्याची आवक सुरूच असल्यानं धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळं गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे. पाणी वाढल्यानं विष्णुपुरी धरण भरलं असून धरणाचे दोन दरवाजे उघडून 15, 900 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढला किंवा पाण्याची आवक वाढली तर धरणाचे आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या घरात शिरले पाणी : नांदेड शहरासह सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान काही घरामध्ये पवसाचे पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नसरतपूर भागातील नोबेल कॉलोनी, राऊत नगर, सीतामाता नगर आदी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.
महापालिकेच्या गलथान कारभारावर नाराजी : पावसाचा फटका अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनादेखील बसला. पावसाचे पाणी त्यांच्या घरात शिरले होते. त्यामुळं लातूरकर कुटुंबीयांची चांगली तारांबळ उडाली. लातूरकर हे अशोक नगर वस्तीमध्ये राहतात. गुडघ्याभर पाणी किचन आणि हॉलमध्ये साचले होते. दरम्यान याबाबत लातूरकर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली. पण एकही कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली नाही. अनेक भागात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान महापालिकेच्या गलथान कारभारावर निखिल लातूरकर यांनी नाराजी व्यक्त केली.
कागदावरच मान्सूनपूर्व तयारी : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके अंतर्गत प्रतिवर्षी मान्सूनपूर्व तयारी म्हणून मे महिन्यात शहरातील प्रमुख नाल्यांची साफसफाई केली जाते. सखल भागात पाणी साचू नये, यासाठी मार्ग मोकळा करून दिला जातो. परंतु, यंदाच्या वर्षी महापालिकेनं केवळ कागदावरच मान्सूनपूर्व तयारी झाल्याचं दर्शविल्यामुळं संततधार पावसामुळं महापालिकेच्या तयारीचा फज्जा उडाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संदर्भात दस्तुरखुद्द आयुक्तांनी स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना फैलावर घेण्याची वेळ आली आहे.
पावसाचा जोर वाढला : हवामान केंद्रानं यलो अलर्ट जारी करत नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज मागील 15 दिवसात पहिलांदाच खरा ठरला. शुक्रवारी सकाळपासून आभाळ भरून आले होते. यानंतर दुपारी 1 पासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. रात्रभर हा पाऊस सुरूच होता. तर शनिवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. सकाळी 10 पासून मात्र शहरासह जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. सायंकाळपर्यंत हा पाऊस सुरूच होता. या पावसामुळं दिलासा मिळाला असता तरी शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास झाला. नवा मोंढा, जुना मोंढा, वसंत नगर, वावानवर, विष्णु नगर, महावीर चौक, श्रीनगर शिवाजीनगर भागातील रस्त्यांसह हिंगोली गेट, लालवाडी येथील भुयारी मार्ग पाण्याखाली गेले. तर कावरा नगर, फरांदे नगर, मोर चौक, गणेशनगर, आंबेडकर नगर, लेवर कॉलनी, श्रावस्ती नगर कौठा, ब्रम्हपुरी, देगलूर नाका आदीसह अनेक भागातील नागरी वस्त्यांमधील पाण्याचा निचरा होत नसल्यानं तुंबलेल्या नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. या घाण पाण्यातून दिवसभर मार्गक्रम करावे लागले. दरवर्षी लाखो रूपये खर्च करून महापालिकेकडून नालेसफाई करण्यात येते. पण सर्वत्र शहरात पाणी साचले त्यामुळं महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.
