मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त पंजाबी स्टार दिलजीत दोसांझनं आज त्याच्या चाहत्यांना दुहेरी सेलिब्रेशनची संधी दिली आहे. एकीकडे देश कारगिल विजय दिवस साजरा करत आहे, तर दुसरीकडे ’बॉर्डर 2’ चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झालं आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त आज दिलजीत दोसांझनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, त्यानं सांगितलं आहे की, ’बॉर्डर 2’चं शूटिंग पूर्ण केले आहे आणि या आनंदात त्यानं सेटवर उपस्थित असलेल्या सर्व लोकांना मिठाई देखील खायला दिली आहे. दिलजीत दोसांझनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये,अभिनेता वरुण धवन, अहान शेट्टीसह चित्रपटाची संपूर्ण मिठाई खात असताना दिसत आहे.
’बॉर्डर 2’चं शूटिंग पूर्ण : व्हिडिओच्या पार्श्वभूमीत बॉर्डर चित्रपटातील ’संदेसे येते हैं’ हे गाणेही वाजत आहे. दिलजीतनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,’बॉर्डर 2 चे शूटिंग पूर्ण झाले आहे, चित्रपटात शहीद निर्मल जीत सिंग सेखों यांची भूमिका साकारायला मिळाली.’ आज 26 जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त दिलजीतनं ही पोस्ट शेअर केली आहे. दिलजीतच्या या पोस्टवर वरुण धवननं ’पाजी एक शॉट बाकी आहे, अनुराग पाक बोलवत आहे.’ अशी टिप्पणी केली आहे. दिलजीतच्या या पोस्टला 1 तासात 1 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आता दिलजीतचा हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. ’बॉर्डर 2’ चित्रपटाबद्दल : सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांनी चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ’बॉर्डर 2’चे दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहेत. आयएमडीबीनुसार, सोनम बाजवा आणि रश्मिका मंदान्ना देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ’बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. 1997 मध्ये आलेल्या ’बॉर्डर’ चित्रपटाचा दुसरा भाग बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर येत आहे.
