मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मोहित सुरी यांचा सैयारा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पण आता या चित्रपटामुळे महाराष्ट्रात वादाला तोंड फुटलं आहे. सैयारा चित्रपटामुळे येरे येरे पैसा 3 या मराठी चित्रपटाला प्राइम टाइममध्ये स्लॉट मिळत नाही, असा आरोप होत आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत याबद्दल प्रश्न विचारला.
उत्तम चित्रपट आला की लोकष्ठ
यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ”मी तुम्हाला सांगतो, जर चित्रपट उत्तम असेल, तर सगळे चित्रपट लावतात. मला मागचा काळ आठवतो. दादा कोंडकेंचे सात की आठ चित्रपट सिल्व्हर जुबिली ठरले. आज लोकांना सांगावं लागत नाही. उत्तम चित्रपट आला की लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात.”
काही गोष्टींना उत्तरही द्यायचं नाही
पत्रकारांशी संवाद साधताना पुढे अजित पवार म्हणाले, ”काही लोकांचे वेगळे विचार असतात. कोण कसं असतं, कोण कसं असतं, हे विचारून तुम्ही माझाही वेळ घेऊ नका आणि पुन्हा त्यांना ’अजित पवार असं म्हणाले’ हे विचारून त्यांचाही वेळ घेऊ नका. आम्हाला हे धंदे करायचे नाहीत. आम्हाला विकास करायचा आहे. तुम्ही सर्वजण हुशार लोक आहात. तुम्ही विकासाला जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे, तेवढं महत्त्व देत नाही.”
ते पुढे म्हणाले, ”तुम्ही विचारायला येता की, ’हा असं बोलला, तुमचं काय मत आहे?’ माला कोणतंही मत व्यक्त करायचं नाही. संविधानाने प्रत्येकाला मते मांडायचा अधिकार दिला आहे आणि काही गोष्टींना आम्हाला उत्तरही द्यायचं नाही.”
सैयारा विरुद्ध येरे येरे पैसा 3
चित्रपटगृहांचे मालक ’सैयारा’ या हिंदी चित्रपटाला प्राधान्य देत आहेत. ’येरे येरे पैसा 3’ या मराठी चित्रपटाला आठवड्यात एकदाही प्राईम टाइम स्लॉट मिळाला नाही. आता हा चित्रपट सिनेमागृहांमधून काढून टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. संजय जाधव दिग्दर्शित ’येरे येरे पैसा 3’ चित्रपटाची निर्मिती मनसे नेते अमय खोपकर यांनी केली आहे. निर्माते आणि मनसे नेते अमय खोपकर म्हणाले की, ”हा माझा चित्रपट आहे पण मी माझ्या चित्रपट आहे म्हणून मराठी चित्रपटांना स्रीन न मिळण्याच्या प्रकाराला विरोध करणार नाही. पण जर हे इतर कोणत्याही मराठी चित्रपटासोबत झाले तर मल्टीप्लेक्सच्या काचा फुटतील!”
