Spread the love

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहेत. स्वयंचलित दरवाजातून 5 हजार 212 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनकडून देण्यात आला आहे.

चार दिवसांपासून दमदार पाऊस : गेल्या चार दिवसांपासून राधानगरी, गगनबावडा, भुदरगड पन्हाळा, आजरा या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. मागील आठ तासात राधानगरी धरण क्षेत्रात 37 मिलिमीटर पावसाची नोंद झाली करण्यात आली आहे. मध्यरात्री धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले. धरणाच्या 3,4, 5 आणि 6 या स्वयंचलित दरवाज्यामधून 5 हजार 712 आणि पावर हाऊसमधून 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे. तर भोगावती, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे.

वारणा धरणाचे उघडले वक्र दरवाजे : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या चांदोलीतील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे धरणाचे वक्र दरवाजे खुले करण्यात आले आहेत. सध्या धरणातून 8 हजार 630 क्युसेक आणि विद्युत गृहातून 1630 असा एकूण 10 हजार 260 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

25 जुलैचं योगदान : गेल्या वर्षीही 25 जुलै रोजी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. यंदाही याच दिवशी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले. या योगायोगाची चर्चा जिल्ह्यात सुरू असून राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे कोल्हापूरकरांच्या नजरा राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळीकडं लागल्या आहेत. सध्या पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 26 फुटांवर पोहोचली आहे. तर 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं.