Spread the love

नवी मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झालेले असून, गुगल मॅपच्या आधारे अनेक आपला रस्ता शोधत असतात. मात्र आता गुगल मॅपच्या आधारे उलवे येथे जाणारी सुसाट कार थेट खाडीत पडल्याची घटना शुक्रवारी बेलापूरमध्ये घडली. घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीतून कार बाहेर काढण्यात आली आहे.

गुगल मॅप लावून महिला चालवत होती कार : गुगल मॅप लावून धावत्या वाहनांचे अपघात घडत असल्याचे प्रकार समोर आलेत. तशाच पद्धतीची एक घटना नवी मुंबईतदेखील शुक्रवारी रात्री एक वाजता घडली. एक महिला तिच्या कारने उलव्याच्या दिशेने जात होती. मात्र, बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालील मार्ग निवडला. गुगल मॅपनुसार तिथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले. मात्र तिची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर खाडीत कोसळली. हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास आला. सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, महिला वाहून जात असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित गस्ती आणि रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने तिला वाचविण्यात यश मिळिवले.

गुगल मॅपवर अवलंबून न राहण्याचे पोलिसांचे आवाहन : गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे अपघात सातत्याने वाढत आहेत. नागरिकांनी गुगल मॅपवर अवलंबून राहताना काळजी बाळगण्याची गरज आहे. स्थानिक माहितीची खातरजमा करूनच प्रवास करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कार थेट खाडीत कोसळल्याने अपघातातून बचावलेली महिला फारच घाबरलेली होती. तिने पोलिसांना सांगितले की, गुगल मॅपमध्ये दाखवलेला रस्ता सरळ असल्याचे तिला वाटले. मात्र प्रत्यक्षात तो रस्ता जेट्टीवर जाऊन थांबतो, हे कळण्याआधीच गाडी खाडीत पडली. सुदैवाने, सागरी पोलीस चौकी अगदी अपघातस्थळाच्या समोर असल्याने तिला तत्काळ मदत मिळाली.