Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनकाळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पावसाळी अधिवेशन प्रचंड गाजले होते. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच सर्वपक्षीय आमदारांना सुनावले होते. ‌’राज्यातील जनता आपल्याला शिव्या देत आहे. आमदार माजले आहेत‌’, असे जनता बोलत असल्याचे खडेबोल देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले होते. या सगळ्या वादांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वातावरण कलुषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीमुळे उभय नेत्यांमध्ये काय चर्चा होणार, याबद्दल राजकीय वतुर्ळाला उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते असलेल्या नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली. नितीन देशमुख हे शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांनी विधिमंडळाच्या लॉबीत घडलेल्या हाणामारीबाबत शरद पवार यांना माहिती दिली असण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. विधिमंडळाच्या लॉबीत हा प्रकार घडल्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा लागला होता. यानंतर नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती. नितीन देशमुख यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली होती. त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर काही दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संबंध कधी नव्हे इतके कटू झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.