Spread the love

शिरोळ तालुक्यातील पहिले महिला शेतकरी लाभार्थी

यड्राव / महान कार्य वृत्तसेवा
यड्राव (ता. शिरोळ) येथे लक्ष्मी मुक्ती योजनेतून शेतकरी नामदेव नारायण यादव व त्यांची पत्नी लता यादव यांना त्यांच्या नावावर सातबारा देण्यात आली. शिरोळ तालुक्यातील या योजनेअंतर्गत सातबारा मिळवणारे ते पहिलेच लाभार्थी ठरले आहेत. प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, मंडळ अधिकारी मच्छिन्द्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राममहसुल अधिकारी गणेश आवळे यांच्या हस्ते सातबारा सुपूर्द करण्यात आला. यावेळी रवी भोसले, विजय कोळी व शेतकरी उपस्थित होते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे कष्टकरी महिलांना हक्काची जमीन मिळत असून त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान मिळत आहे. लता यादव यांच्या नावावर जमीन झाल्यामुळे त्या आता शेतजमिनीच्या कायदेशीर मालक ठरल्या असून विविध शेतीसंबंधी योजना, पीएम किसान व नमो किसान योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत.
यावेळी ग्राममहसुल अधिकारी गणेश आवळे यांनी सांगितले की, “लक्ष्मी मुक्ती योजना ही महिला सक्षमीकरणाचा प्रभावी टप्पा आहे. यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाबरोबरच निर्णयक्षमतेचा अधिकार मिळतो. आणखी अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच यड्राव क्षेत्रातील पाच प्रकरणे सध्या आली असून त्यांना लवकरच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
शेतकरी नामदेव यादव यांनी समाधान व्यक्त करत, आमच्या कुटुंबासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. जमिनीवर पत्नीचे नाव झाल्याने ती आत्मनिर्भर झाली असल्याचे ते म्हणाले.
योजनेच्या माध्यमातून महिलांना मालकी हक्काची जमीन देण्याची प्रक्रिया सुलभ केल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे इतर शेतकरीही या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना महसूल विभागाच्या जिवंत सातबारा टप्पा दोन अंतर्गत अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अपाक, शेरा कमी करणे, एकूण नोंद कमी करणे, पोटखराब दुरुस्ती, क्षेत्र लागवड लायक आणणे, सलोखा योजना अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच इतर अधिकारातील महिला वारसदारांची नावे कब्जेदार सदरी आणून त्यांना हक्काचा सन्मान मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे,
गणेश आवळे, ग्राममहसूल अधिकारी यड्राव