Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

”जल जीवन मिशनच्या कामाचा मोबदला मिळाला नाही, म्हणून सांगलीत हर्षल पाटील या तरुणानं आत्महत्या केली. याला सरकार आणि संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. 1 कोटी 40 लाख रुपये द्यायला तुमच्याकडं नाहीत, मग कामं देता कशाला?” असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला. ”सरकार अमानुष निर्दयी आहे. सरकारनं स्वत:च्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत. हर्षल पाटीलची आत्महत्या ही मराठी तरुणांची अगतिकता आहे. सरकारनं केलेला हा सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळं सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राज्याचं स्मशान झालं : पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”हे सरकार हवेत, भ्रमात वावरत आहे. पंतप्रधानांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन राहावं, शेतकरी कसे आत्महत्या करताहेत, गेल्या सहा महिन्याती किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हे पाहावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं कसं स्मशान केलेलं आहे, ते पंतप्रधान मोदींनी पाहावं, असं राऊत म्हणाले. हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. हर्षल पाटील या तरुणानं आत्महत्या केली, त्याला द्यायला 1 कोटी 40 लाख रुपये नाहीत. ठेकेदारांची 80 हजार कोटींची बिलं थकली आहेत. अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीसुद्धा ही तिन लोकं मजा करत फिरत आहेत,” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली.

तुमच्याच पक्षात नक्षलवाद : ”परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त गडचिरोलीला गेले. तिथून शहरी नक्षलवाद आणि माओवाद वाढला आहे, असं त्यांनी सांगितलं. पण अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे. हिंसाचार हा नक्षलवाद असेल तर तुमच्या पक्षात आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे. काल सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या भावानं दौंडमध्ये एका नर्तकीवर गोळीबार केला. मग ही हिम्मत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना, खुलेआम मारामाऱ्या होताहेत. हनी ट्रॅप हा सुद्धा नक्षलवादच आहे. देवेंद्र फडणवीस थांबवा हे, महाराष्ट्राची अब्रु जात आहे,” असा घणाघात संजय राऊतांनी केला.

तुमच्यात आहे का हिम्मत : ”काही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबत आमच्या महाराष्ट्रातील महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना अडवून जाब विचारला, आणि तुम्ही काय केलं? तुमच्यामध्ये हा जाब विचारण्याची हिम्मत आहे. का? कोकाटेंसारखे मंत्री आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना सरकारमधून काढण्याची तुमच्यात हिम्मत नाही. हे प्रकार थांबावा आणि महाराष्ट्र राज्य गांभीर्यानं चालवा. इथं दिल्लीत येऊन खरं बोला, त्यांना खोटं बोलण्याचा आणि विस्मृतीचा आजार जडलाय,” असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

राज्याची लूटमार सुरू : ”कंत्राटदारांकडून कामं करुन घ्यायची आणि त्यांचे पैसे द्याला 80 हजार कोटी नसतील, तर हे राज्य डबघाईला आलं आहे. सर्व विभागाच्या योजनांतून राज्याची लूटमार सुरु आहे, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. कंत्राटदारांना द्यायला पैसे नसतील मग कामं देता कशाला? हर्षल पाटील यांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून आहे. राज्यातील कायद्याचा वापर केवळ विरोधकांचे गळे कापण्यासाठी, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला जात आहे,” असं खासदार संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? : यापूर्वी शिवसेनेचे खासदार, आमदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. परंतू आता या सरकारमधीलच चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. फडणवीसांचे संकटमोचक हनी ट्रॅपमध्ये अडकलेत. त्यामुळं फडणवीसांचे हात दगडाखाली आहेत. ते आता काही करु शकत नाही. चेहऱ्यावर खोटे हसू आणून भाषण करत फिरताहेत. पण हेच जर विरोधकांकडून झालं असतं तर मोठ्या स्क्रिन लावून सर्व हे फडणवीसांनी दाखवलं असतं, अशी खोचक टीका राऊतांनी फडणवीसांवर केली. तसेच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे काही मुस्लीम संघटनासोबत चर्चा करणार आहेत, यावर बोलताना राऊत म्हणाले की, ”मी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो. समाजात दुही राहता कामा नये. पण आज जे समाज समाजात विष पेरण्याचं काम करताहेत, त्या महाराष्ट्रातील मंत्र्यांना विष खाऊन आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा टोला राऊतांनी लगावला. दरम्यान, राज-उद्धव एकत्र येणार असल्यामुळं त्यांची झोप उडाली आहे, म्हणून आता उदय सामंत हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. पण सामंत यांनी राज ठाकरेंच्या घराखाली एक कॉटेज बांधावं,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.