हैदराबाद / महान कार्य वृत्तसेवा
19 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखनं इघ्ऊए महिला विश्व बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या गेममध्ये माजी विश्वविजेत्या चीनच्या टॅन झोनग्यीला पराभूत करुन हा सामना 1.5-0.5 असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह दिव्या कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरली. महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. विशेष म्हणजे दिव्या पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी होत आहे.
101 चालींत दिव्याचा विजय : उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या दुसऱ्या मानांकित जोनर झू आणि त्यानंतरच्या ग्रँडमास्टर डी हरिकाला पराभूत करुन दिव्यानं स्पर्धेत वर्चस्व गाजवलं आणि टॅनविरुद्धचा तिचा 101 चालींचा विजय तिच्या वाढत्या बुद्धिबळ कौशल्याचा पुरावा होता. दुसऱ्या उपांत्य फेरीत, कोनेरु हम्पीनं अव्वल मानांकित चीनच्या टिंगजी लेईशी 75 चालींमध्ये बरोबरी साधली. हम्पी आता लघु स्वरुपात लेई विरुद्ध टायब्रेकर सामना खेळेल.
कोण आहे दिव्या देशमुख : 9 डिसेंबर 2005 रोजी नागपूर इथं जन्मलेल्या दिव्यानं वयाच्या पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तिचे पालक डॉक्टर आहेत. दिव्यानं 2012 मध्ये वयाच्या सातव्या वर्षी अंडर-7 राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं. त्यानंतर तिनं अंडर-10 (डरबन, 2014) आणि अंडर-12 (ब्राझील, 2017) प्रकारात जागतिक युवा जेतेपदं जिंकली. त्यानंतर तिनं 2014 मध्ये डरबन इथं झालेल्या अंडर-10 वर्ल्ड युथ टायटल आणि 2017 मध्ये ब्राझीलमध्ये अंडर-12 कॅटेगरीचं टायटल जिंकलं. तिच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळं ती 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर बनली, ज्यामुळं ती ही कामगिरी करणारी विदर्भातील पहिली आणि देशातील 22 वी महिला खेळाडू बनली.
दिव्यानं 2023 मध्ये मिळवला आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताब : 2023 मध्ये दिव्याला आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताबही मिळाला. 2024 मध्ये, तिनं वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स अंडर-20 चॅम्पियनशिप देखील जिंकली, जिथं तिनं 11 पैकी 10 गुण मिळवून स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं. याशिवाय, 45 व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यातही तिनं महत्त्वाची भूमिका बजावली. दिव्या ही आशियाई ज्युनियर चॅम्पियन देखील आहे. दिव्या आता बुद्धिबळाच्या जगात एक प्रसिद्ध नाव आहे. नंबर वन खेळाडू हौ यिफानला हरवलं : दिव्या देशमुखनं यावर्षी इघ्ऊए वर्ल्ड ब्लिट्झ टीम बुद्धिबळ स्पर्धेत जगातील नंबर वन खेळाडू हौ यिफानचा पराभव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल तिचं कौतुक केलं. 10 ते 16 जून दरम्यान लंडनमध्ये झालेल्या इघ्ऊए वर्ल्ड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या टप्प्यात दिव्यानं चीनच्या यिफानला हरवलं होतं. दिव्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे.
