Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 6000 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या टेंडर प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. या प्रक्रियेमध्ये भाजप नेत्यांच्या संबंधीत कंपन्यांना झुकते माप दिलं गेलं, असा दावा त्यांनी केला असून, विशेष तपास पथक आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

‘टेंडर फिक्सिंग’मध्ये भाजप कनेक्शन?

संदीप देशपांडे म्हणाले की, ”या संपूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये भाजपशी संबंधित असलेल्या कंपन्यांना सरस ठरवण्यासाठी अटी शर्ती पद्धतशीरपणे रचल्या गेल्या. यामध्ये भाजपचा गुजरातमधील राज्यसभा खासदाराचे कनेक्शन असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. या खासदाराचा मुलगा सनी पांड्या हा बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर तो सातत्याने दिसतो. हे योगायोग नाहीत, हे संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला.

”जे पहारेकरी होते, तेच आता तिजोरी लुटायला निघालेत का?” असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यांनी सांगितलं की, ”सनी पांड्याचं नाव घेतल्यावर आम्ही थोडा रिसर्च केला. ते गुजरातमधून राज्यसभेत गेलेल्या भाजप खासदारांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता हे स्पष्ट होतंय की टेंडरमध्ये भाजप कनेक्शन आहे.”

संदीप देशपांडे यांनी म्हटले की, ‘निविदांच्या अटी अशा प्रकारे ठरवल्या गेल्या आहेत, ज्या एक विशिष्ट कंपनीच्या फायद्याच्या आहेत आणि हे अधिकारी आणि वरिष्ठ यंत्रणांच्या संमतीशिवाय शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला. संदीप देशपांडे यांनी महापालिका आयुक्त, नगरविकास खाते आणि मुख्यमंत्र्यांकडे याची चौकशी करण्याची मागणी केली.