Spread the love

मॅनचेस्टर / महान कार्य वृत्तसेवा

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या शेवटी भारताचा स्कोअर 264/4 एवढा झाला आहे. दिवसाअखेरीस शार्दुल ठाकूर नाबाद 19 आणि रवींद्र जडेजाही नाबाद 19 रनवर खेळत आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांमध्येही 94 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली, पण केएल राहुल 46 रनवर आऊट झाला.

यशस्वी जयस्वालने 58 रनची खेळी केली, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला साई सुदर्शन 61 रनवर माघारी परतला. साई सुदर्शनचं टेस्ट क्रिकेटमधील हे पहिलं अर्धशतक होतं. कर्णधार शुभमन गिल यालाही मोठी खेळी करता आली नाही. 12 रनवर गिल आऊट झाला, त्यानंतर ऋषभ पंतच्या पायाला बॉल लागल्यामुळे तो 37 रनवर मैदानातून बाहेर गेला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सला 2 विकेट मिळाल्या, तर क्रिस वोक्स आणि लियाम डॉसन यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता 78 रन केले, पण दुसऱ्या सत्रात भारताने 71 रनवर 3 विकेट गमावल्या. शेवटच्या सत्रात मात्र भारताने फक्त 1 विकेट गमावून 115 रन केले.

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारताने टीममध्ये 3 बदल केले आहेत. आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी हे दुखापतीमुळे टीमबाहेर झाले आहेत. तर करुण नायरला डच्चू देण्यात आला. या तिघांऐवजी अंशुल कंबोज, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शनला संधी देण्यात आली. अंशुल कंबोजने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे. सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे.

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज