Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील रहिवासी आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण केलं होतं. मात्र, शासनाकडून कामाचे पैसे न मिळाल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या मानसिक त्रासामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर सरकारवर जोरदार टीका होत आहे. सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, हर्षल पाटील हा अभियंता असून, तांदळे वाळवा या गावचा तो अभियंता आहे. अभियंत्याने आत्महत्या केली असून याप्रकरणी त्या अभियंत्याच्या नावावर कुठलंच काम नाही. त्या योजनेवर कुठलं बिल पेंडिंग नाही. एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलं असावं, मात्र या बिलाची कुठेच नोंद नाही. जिल्हा परिषदेच्या सीईओंशी आमच्या कार्यालयाने संपर्क केलेला आहे. मी स्वत: कार्यकारी अभियंत्यांशी बोललो आहे. त्यामुळे मला तरी असे वाटते की, त्यांचा या गोष्टीत कुठलाही संबंध नाही. सबलेट काम केले असेल तर ते आम्हाला माहिती नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींनी महाराष्ट्रामध्ये येऊन दोन दिवस राहावं. फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी कसं स्मशान केलं आहे ते पाहावं. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असून त्याला कोण जबाबदार? अशी विचारणा त्यांनी केली. न्याय देण्यासाठी संबंधितांना गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांनी अधिक या आत्महत्येबाबत तपास केला पाहिजे. अपूर्ण माहितीवर बोलू नये बबल्या. नीट बोलावं, कुठल्याही गोष्टीवर उठायचं आणि बोलायचं याला अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले आहे.