मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
कल्याणमधील नांदिवली परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला एका तरुणानं बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. अशातच या प्रकरणावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनंही याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करुन कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे. जान्हवी कपूर म्हणाली की, ”या माणसाला तुरुंगात टाकायला हवे. कुणाला या माणसाचं वर्तन ठीक कसं वाटू शकतं? त्याला असं का वाटलं की, तो सहज एखाद्यावर हात उचलू शकतो?”
”हे कोणत्या प्रकारचं संगोपन आहे, जे तुम्हाला पश्चात्ताप, अपराधीपणा किंवा मानवतेच्या भावनेशिवाय अशा कृती करण्यास प्रवृत्त करते? तुमचा मेंदू असंच काम करतोय, हे माहिती असूनही तुम्ही स्वत:सोबत कसं जगताय? हे किती लाजिरवाणं आहे. आणि लाज तर आपल्यालाही वाटायला हवी की, अशा वागण्याचं समर्थन करतोय, शिक्षा नाही. याला शिक्षा झालीच पाहिजे, काहीही कारण नको.”, असंही जान्हवी कपूर म्हणाली.
कल्याण पूर्वमधील नांदिवली परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी परप्रांतीय आरोपी गोकुळ झा या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली. गोकुळ झा याचा भाऊ रंजीत झा याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आलं आहे. संबंधित डॉक्टरांकडे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसले होते. त्यामुळं रिसेप्शनिस्टनं गोपाल झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितलं. पण तो तरुण जबरदस्तीनं डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रिसेप्शनिस्टनं अडवलं असता त्या तरुणानं तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तिचे कपडे फाटले आणि तिला जबर दुखापत झाली, अशी माहिती समोर आली. पण, त्यानंतर या घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही व्हायरल झाला. यामुळे कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणाला वेगळं आलं. आधी रिसेप्शिनस्ट तरुणीला मारहाण झाल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. पण आता तरुणीनं मारहाण केल्याचा सीसीटीव्ही समोर आला. आरोपी गोकुळ झा अंगावर आल्यानं त्याच्या वहिनीला रिसेप्शनिस्टनं कानाखाली मारल्याचं या सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. या व्हिडीओमुळे प्रकरण वेगळ्या ट्रॅकवर गेलं खरं. पण तरीसुद्धा आरोपीनं तरुणीला ज्यापद्धतीनं मारहाण केली, त्यावरुन त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
