Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईत 2006 मध्ये झालेल्या लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. एका आरोपीचा मृत्यू झाला. सत्र न्यायालयाने 5 जणांना फाशीची शिक्षा आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निकालाला आरोपींनी हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 189 जण ठार झाले होते.  तर, 700 हून अधिक नागरीक जखमी झाले होते. राज्य सरकारकडून या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आहे.

हायकोर्टाचे ताशेरे…

न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाकडून  हा निकाल सुनावण्यात आला.  मुंबई हायकोर्टाने आपल्या निकालात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत. आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत. कोर्टाने साक्षीदारांवरही शंका उपस्थित केल्या. साक्षीदारांच्या साक्षी या विश्वासार्ह नसल्याचे मत नोंदवले. बॉम्ब, बंदुका, नकाशे जुळून आले नाही.  2006 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा पहिला निकाल 2015 मध्ये आला होता. मोक्का कोर्टाच्या निकालानंतर आरोपीनी हायकोर्टात आव्हान दिले. त्यानंतर आता हायकोर्टाने मागील काही महिन्यांपासून सलग सुनावणी करत आज निकाल सुनावला.

हायकोर्टाच्या या निकालाने एकूणच तपासावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सत्र न्यायालयात 12 आरोपींना दोषी ठरवण्यासाठी योग्य असलेले पुरावे हायकोर्टात टिकले नसल्याने दहशतवादविरोधी पथकाच्या तपाला धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईत 7 जुलै 2006 रोजी झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटाने देशच नव्हे तर संपूर्ण जग हादरले होते. सायंकाळच्या वेळी मुंबई लोकल मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. सायंकाळी 6.30 ते 6.50 या दरम्यानच्या वेळेत पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये हे स्फोट झाले. ऐन गर्दीच्या वेळी साखळी ब..ॉम्बस्फोट झाले होते.

सत्र न्यायालयाने सुनावली होती 12 जणांना शिक्षा…

2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवले होते. यातील पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. विशेष मोक्का कोर्टाने फैजल शेख,असिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नाविद खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.  तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, जमीर अहमद शेख यांना विशेष कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता.

्‌‍न्न कोणत्या रेल्वे स्थानकावर झाले होते स्फोट…

माटुंगा रोड, माहीम जंक्शन, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांदरम्यान हे बॉम्बस्फोट झाले होते. संध्याकाळी 6.24 ते 6.42 वाजताच्या दरम्यान हे बॉम्बस्फोट झाले. लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये एका बॅगेत स्फोटकांसह प्रेशर कुकर ठेवण्यात आले. या प्रेशर कुकरचा स्फोट करून ब्लास्ट करण्यात आला.