Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं मुंबईत आज जोरदार बॅटिंग केलीय. हवामान विभागाने या आठवड्यात मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. यंदा जुलै महिन्यात मुंबईत खूपच कमी पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे मुंबईत जुलै महिन्यात जोरदार पाऊस कोसळतो, परंतु यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून, काही सखल भागात पाणी साचलंय. शहराच्या काही भागात वाहनांची वाहतूक मंदावलीय, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

पूर्व उपनगरांतील बहुतेक भागात मुसळधार पाऊस : या महिन्याच्या सुरुवातीला पाऊस कमी प्रमाणात पडला आणि गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पाऊस रात्रभर कोसळत राहिला. मुंबईत पावसाचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी पूर्व आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले.

लोकल गाड्या थोड्या उशिराने धावत असल्याच्याही तक्रारी : पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. सकाळच्या गर्दीच्या वेळी पाऊस आणि इतर कारणांमुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावली होती. काही प्रवाशांनी लोकल गाड्या थोड्या उशिराने धावत असल्याच्याही तक्रारी केल्यात. सोमवारी सकाळी 8 वाजता 24 तासांच्या कालावधीत मुंबईत सरासरी 23.45 मिमी, पूर्व उपनगरात 36.42 मिमी आणि पश्चिम उपनगरात 50.02 मिमी पाऊस पडला, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज : पुढील 24 तासांत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (घ्श्ऊ) मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी 9.19 वाजता भरतीमुळे 3.91 मीटर उंचीच्या लाटा उसळल्यानंतर रात्री 8.37 वाजता आणखी 3.38 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. दुपारी 3.03 वाजता 2.28 मीटर उंचीची कमी भरती येण्याची शक्यता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.