Spread the love

बारामती / महान कार्य वृत्तसेवा

”सभागृहातच कायदा मोडला जात असेल, तर सामान्य जनतेने काय करायचं?,” असा संतप्त सवाल माजी मंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा येथे दिव्यांग बांधवांच्या वतीने बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर आणि सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर परखड आणि स्फोटक भाष्य केलंय.

कायदा एकतर्फी कसा? : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ऑनलाईन गेम ॲपच्या जाहिरातीवरूनही बच्चू कडू यांनी टीकेची झोड उठवली. ”सचिन तेंडुलकर यांनी ‘रमी’ची जाहिरात केली आणि त्याचे बळी राज्याचे कृषिमंत्री ठरले. मोबाईलवर पत्ते खेळले तर चालते, पण ऑफलाईन खेळले तर पोलीस पकडतात. कायदा असाच एकतर्फी असेल का?,” असा खोचक सवाल त्यांनी केला.

देशात सध्या जाती-धर्माच्या नावाखाली नंगानाच सुरू : यावेळी बच्चू कडू यांनी सध्या देशात सुरू असलेल्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणावरही जोरदार टीका केली. ”प्रत्येक जण आपल्या जातीचा किंवा धर्माचा झेंडा घेऊन बसला आहे. त्यांनी नंगानाच केला, तरी त्यांना चालते. कारण त्यांच्या हाती जातीचे धर्माचे ‘झेंडे’ आहेत. पण सामान्य जनतेने प्रश्न विचारले, तर त्यांच्यावर खटले दाखल होतात. कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते,” असा आरोप करीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

पूर्वी कामातून उत्तर मिळायचं, आता गुंडगिरीतून : बच्चू कडू म्हणाले की, ”पूर्वी राजकारणी कामातून उत्तर द्यायचे, आज गुंडागर्दीतून देतात. आता तर राजकारणात गुंडगिरीचा वापर सर्रास सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंडांची सत्ता निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आका आहे आणि त्या आकाचादेखील आका आहे. कोणाला कसं संपवायचं, याचेच राजकीय डावपेच सुरू आहेत. लोकांमध्ये एवढी गुलामगिरी रुजवली गेली आहे की, बाप मेला तरी चालेल, पण नेता जिवंत पाहिजे, हीच मानसिकता ठेवली जाते.”

नक्षलवाद केवळ दोन तालुक्यांत, मग जनसुरक्षा कायदा कशासाठी? : जनसुरक्षा कायद्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. ”सरकार म्हणतं महाराष्ट्रात फक्त दोनच तालुक्यात नक्षलवाद आहे, मग पूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याची गरज काय? खरे नक्षलवादी कोण आहेत हे जर जाहीर केलं, तर देशात मोठा स्फोट होईल,” असा इशारा देत त्यांनी शासनाच्या हेतूंवर संशय व्यक्त केला.

बच्चू कडू यांना विशेष सन्मान : दिव्यांगांसाठी लढा उभारलेल्या बच्चू कडू यांचा निरा येथे दिव्यांग बांधवांनी नागरी सत्कार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या पेन्शन वाढीसाठी मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनाला यश मिळून पेन्शन 2500 रुपये करण्यात आली आहे. यानिमित्ताने दिव्यांग बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला आणि बच्चू कडू यांना विशेष सन्मान दिला. या वेळी बोलताना त्यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवरही सडकून टीका केली. ”शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणवणाऱ्या राज्यात दिव्यांगांसाठी अजूनही आंदोलन करावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे. संवेदनाहीन लोक सत्तेवर येतात, तेव्हा संवाद हरवतो आणि यंत्रणा कुचकामी होते. हे वास्तव बदलणं गरजेचं आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात अनेक दिव्यांग कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि युवा उपस्थित होते. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.