Spread the love

सूत्र जामनेरमधून, मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो दाखवत राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, एकनाथ खडसेंची…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅपची चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ना हनी ना ट्रॅप असल्याचे सांगत हनी ट्रॅपची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, आज (21 जुलै) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोटो जळगाव येथील प्रफुल्ल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची सीबीआय मार्फत चौकशी होऊद्या! दूध का दूध पानी का पानी होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले. यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो दाखवत गंभीर आरोप केलाय.

संजय राऊत म्हणाले की, या राज्यात रोज इतके अनैतिक कृत्य घडत आहेत आणि देवेंद्र फडणवीस काहीच करू शकत नाहीत. महाराष्ट्राला कलंकित करणारे हे सरकार आहे. आमदार, मंत्री, पदाधिकारी ज्या प्रकारचे वर्तन करतात हे महाराष्ट्रात कधी घडलेले नाही. सुनील तटकरे यांच्यासमोर त्यांच्या छावा संघटनेच्या राज्यप्रमुखांवर हल्ला झाला आणि तो हल्ला राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी केला. आमदार निवासात मारामाऱ्या होत आहे आणि हनी ट्रॅपचे प्रकरण सुरू आहेत.

मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात. कुठे गेल्या भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या? विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी थाटात पुढे येत होत्या.  त्या आज कुठे आहेत? महिलांवर अत्याचार वाढले आहेत आणि हनी ट्रॅपचे प्रकरण वाढले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांना माहित आहे की, चार मंत्री आणि हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. आज मी एक ट्विट केले आहे. त्याची सत्तता पडताळून पाहा देवेंद्र फडणवीस साहेब. आमचे जे खासदार फुटले ते फडणवीस यांनी फोडले असे म्हणताय किंवा अमित शहा यांनी फोडले असे म्हणताय, त्यात ईडी सीबीआय आहेच पण चार तरुण खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्र्याकडे कायद्याची पदवी असणे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही. महाराष्ट्राला एक चांगल्या मुख्यमंत्र्यांची, सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची परंपरा होती. मुख्यमंत्र्याकडे नुसतं कायद्याची पदवी असणे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही. नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात मनामध्ये एक संस्कार असावा लागतो, तो दिसत नाही. हे राज्य रसातळाला जाताना दिसत आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

लोढावरती हनी ट्रॅपची केस, सूत्र जामनेरमधून हलली

मी जो फोटो दिलेला आहे, त्याची चौकशी करा. प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे. लोढावरती हनी ट्रॅपची केस दाखल झाली आहे. याची सूत्र जामनेरमधून हलली आहेत. याचे सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई आणि दिल्ली इथून हलली आहेत. त्यांनी त्याला वापरलं आहे तेच आता हनी ट्रॅपमध्ये सापडले आहे. एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या. मी जे चार सांगितले ते देवेंद्र फडणवीस यांना देखील माहित आहे. म्हणून  पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत. आज सुद्धा पाच रेड टाकलेल्या आहेत. काल दिवसभर पोलीस शोधत होते की, लोढाकडील पेन ड्राईव्ह आणि सीडी कुठे लपवलेल्या आहेत. चार मंत्र्यांपैकी दोन मंत्री हे भाजपचेच आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केलाय. 

विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून भाजपने हनी ट्रॅप लावला संजय राऊत पुढे म्हणाले की, प्रफुल लोढा हनी ट्रॅपमधून अनेक महत्त्वाच्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने पकडत होते. स्वत: मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा सत्कार स्वीकारताना फोटो आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी प्रफुल्ल लोढाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटोच माध्यमांना दाखवला. हा भारतीय जनता पक्षाचा खास हस्तक आहे आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वत:च्या लोकांवर देखील ट्रॅप लावले गेलेत. पण, आता ते स्वत:वरच उलटल्याने त्यांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये काही डाग धुतले जात नाही, त्यातला हा एक डाग आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केलाय.