Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि वनडे कॅप्टन रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून अनपेक्षितपणे निवृत्ती जाहीर केली, ज्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट थोडासा निरुत्साहपूर्ण झाला. इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वीच त्याने हा निर्णय जाहीर केला. अनेकांना असं वाटतं की, रोहितने अजून किमान एक मालिका खेळून फेअरवेल देण्याची संधी द्यायला हवी होती. अशातच बीसीसीआयचे माजी निवडकर्ते जतीन परांजपे यांनाही असं वाटतं की, रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये त्याने जेवढं केलं त्यापेक्षा खूप काही जास्त करू शकला असता.

सायसर ब्रोचा यांच्या ‘अ सेंच्युरी ऑफ स्टोरीज’ या पॉडकास्टमध्ये बोलताना परांजपे यांनी रोहितशी झालेल्या संवादाची आठवण करून दिली. ”मला आठवतंय की, रोहित शर्मा भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळत नव्हता. त्यावेळी आमचं बोलणं झालं होतं आणि रोहित म्हणाला होता, ‘जतीन, मी क्रिकेटची सुरुवात रेड बॉलने केली होती. तुम्ही असे कसे म्हणू शकता की मला कसोटी क्रिकेटमध्ये रस नाही?’ मला त्याचा संदेश मिळाला आणि मला अशीच अपेक्षा होती की तो हेच बोलेल,” असे परांजपे म्हणाले.

रोहित शर्माने 7 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे हिटमॅनने ही माहिती दिली. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडण्यापूर्वीच त्याने हा निर्णय घेतला आहे. अलीकडच्या काळात रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर टीम इंडियासाठी दुसरा कॅप्टन शोधण्यात आला. त्यामुळे रोहित शर्माने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली, अशी चर्चा आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करताना शुभमन गिल याची कर्णधारपदी नियुक्ती केली. कर्णधार बनल्यानंतर शुभमन गिलने फलंदाज म्हणूनही आपली छाप पाडली आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत.