छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा
संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गावातील एक भोंदूबाबा गावातील भोळ्याभाबड्या लोकांसोबत आघोरी कृत्य करत होता. लग्न होत नाही, मूल होत नाही, दारू सोडायची अशा लोकांवर काठ्या मारून, लघु शंका पाजून, तोंडात बुट घालून अघोरी उपचार करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून या बाबाचा भांडाफोड करण्यात आला असून अनेक धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत आरोपी भोंदूबाबा नागरिकांना काठीने मारून भूत उतरवयाचा. तसेच स्वत:ची चप्पल किंवा बूट तोंडात पकडायला लावून दारू सोडायला लावायचा. रोग घालवण्यासाठी लघुशंका प्यायला लावायचा. एवढंच नव्हे तर नराधम भोंदूबाबा महिलांना शिव्या देऊन चुकीचा स्पर्श करायचा. लग्न होत नाही, मूल होत नाही, अशा लोकांना अघोरी कृत्य करून आरोपी भोंदूबाबाने सगळ्यांची फसवणूक केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचा भांडाफोड केला आहे. अनिसचे कार्यकर्ते पोलीसांना घेऊन घटनास्थळी जात असताना, आधीच भोंदूबाबा प्रसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील बिरोबाच्या मंदिरात हा सर्व प्रकार सुरू होता. मंदिरात दोन मोठ्या लाकडी काठ्या आढळल्या आहेत. त्याच काठ्यांनी तो येणाऱ्या भक्तांना भूत लागलं असल्याचं सांगत मारहाण करायचा. ज्यांना भूतबाधा झाली आहे, अशांना तो मारायचा, त्यानंतर त्याचा बूट तोंडात धरायला लावायचा. महिलांना देखील तो नको त्या ठिकाणी स्पर्श करत होता, असाही आरोप त्या भोंदूबाबावरती आहे. अंनिसचे काही जण तिथे आल्यानंतर त्यांनी पाहिलं तो भोंदू बाबा एका महिलेला हाताने मारहाण करत होता, त्यानंतर तो एका व्यक्तीला काठीने मारायला लागला. तिथे एक माणूस आला होता त्याला भूतबाधा झाली म्हणून त्याला देखील काठीने मारलं. त्यानंतर त्याला तोंडात बूट धरायला लावला. त्यानंतर त्याला खाली गवतात झोपवलं आणि त्याच्या गळ्यावरती बुटासह पाय दिला, त्यानंतर मंदिराभोवती पाच चक्रा मारायला लावल्या, अशी माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिली. संजय पगार असं 48 वर्षीय भोंदूबाबाचं नाव आहे. तो वैजापूर तालुक्यातील शिऊर गावचा रहिवासी आहे. लग्नाच्या वरातीत घोडे पुरवण्याचा त्याचा व्यवसाय आहे. पण अनेक वर्षांपासून तो भोंदूगिरी करत मंदिरात दरबार भरवायचा. रविवार आणि गुरुवारी अघोरी कृत्य करत हा दरबार भरवला जात होता. विशेष म्हणजे जो बाबा दुसऱ्याचे लग्न जमवत होता, त्याच्यावरच पत्नीच्या छळाचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. याबाबतची माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक विनय राठोड यांनी दिली.
