पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने आपला अहवाल सादर केलाय. यामध्ये पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर देखील कारवाईची मागणी केली गेली आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आणि बालकल्याण समितीचा अहवाल समोर आला आहे. हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी गेल्याचं या अहवालात म्हटलं आहे. तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत, अशी देखील शिफारस समितीने केली आहे. पोलिसांच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं देखील म्हटलं गेलं आहे.
मयुरी हगवणे प्रकरणाची जर दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती, असं देखील अहवालात म्हटलं आहे. त्याचबरोबर, मयुरी हगवणेची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस देखील समितीने केली आहे.
महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळी प्रकरणाबाबतचा पहिला अहवाल विधानसभेत शुक्रवारी सादर केला. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने न्याय मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे.
दरम्यान, चौकशी करताना समितीला काही महत्त्वाची माहिती मिळाली. हुंड्याच्या माध्यमातून ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम अशा विविध वस्तू आणि पैसे घेतल्याचे पुरावे देखील समितीला मिळाले आहे. त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि संपूर्ण हगवणे कुटूंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.
