Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

पुणे जिल्ह्याच्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका नराधमाने रस्त्याने पायी चाललेल्या एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं पीडित महिलेला एका निर्मनुष्य ठिकाणी गाठून तिच्यावर जबरदस्ती केली. तसेच बाजुला असलेल्या झुडूपात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अवघ्या 24 तासांत पोलिसांनी घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी एका जॅकेटवरून तपास करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

बाळू दत्तू शिर्के असं अटक केलेल्या 35 वर्षीय नराधम आरोपीचं नाव आहे. तो मावळ तालुक्यातील जीवन येथील रहिवासी आहे. 15 जुलै रोजी त्याने एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अवघ्या 24 तासांत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठाकूरसाई गावात घडली आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी (15 जुलै) दुपारी 33 वर्षीय विवाहित महिला माहेरी जाण्यासाठी पायी निघाली होती. ती रस्त्याने एकटी चालत जात होती. यावेळी आरोपी बाळू शिर्के याची तिच्यावर नजर पडली. एकटीला पाहून नराधमाची नियत बदलली, त्याने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला.

पीडित महिला रस्त्यावर एका निर्मनुष्य ठिकाणी पोहचली असता, तिथे कोणीही नसल्याचे पाहून आरोपीनं महिलेला जबरदस्तीने ओढून एका निर्जन ठिकाणी नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडितेला त्याच अवस्थेत सोडून आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना शिताफीने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना दिसून आला. विशेष म्हणजे आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोधमोहीम राबवली आणि अखेर आरोपी बाळू शिर्के याला अटक केली. घटनेच्या दिवशी पीडित महिलेचा आपल्या पतीसोबत वाद झाला होता. पतीशी वाद झाल्यानंतर रागाच्या भरात ती घराबाहेर पडली होती. ती माहेरी जात असतानाच नराधम शिर्के याने तिच्यावर डाव साधला आणि लैंगिक अत्याचार केला. एका विवाहित महिलेवर दिवसाढवळ्या अत्याचार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.