रायगड / महान कार्य वृत्तसेवा
मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्याचा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नोंद झाली. याचा राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या यादीमध्ये स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, पन्हाळा आणि जिंजीसह रायगड किल्ल्याचा समावेश आहे. याच रायगड किल्ल्यावर स्वराज्याला शिवाजी महाराज यांच्या रूपानं पहिले छत्रपती मिळाले. याच किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड नावाचं गाव आहे. पाचाड गावात शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा अजूनही जिवंत आहेत. हे ठिकाण राजमाता जिजाऊ यांचा राजवाडा आहे. ज्या तेजस्वी स्त्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराज घडले, ज्यांच्या मार्गदर्शनानं स्वराज्याचं स्वप्न साकार झालं. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ उतरत्या वयात वास्तव्यास होत्या तोच आता वेळेच्या ओघात हरवत आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याची दुरवस्था : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्यासाठी रायगडच्या पायथ्याला राजवाडा उभारला. आपल्या उतरत्या वयात राजमाता जिजाऊ या पाचाडच्या राजवाड्यात वास्तव्यास होत्या. सध्या या राजवाड्याचा परिसर झाडा-झुडपांनी व्यापलेल्या जंगलासारखा झाला आहे. सर्वत्र गवत उगवलं असून, जंगली वनस्पती आणि झाडांनी या परिसरातील शिवकालीन वास्तूंचे अवशेष गवतांनी व्यापले आहे. राजवाड्याच्या दरवाज्यासमोर उभारल्यानंतर आणि राजवाड्याची भक्कम तटबंदी पाहिल्यावर शिवकाळात राजवाड्याची भव्यता काय असेल याची प्रचिती येते. राजवाड्याच्या आत प्रवेश केल्यानंतर काही वास्तूंचे अवशेष नजरेस पडतात. यामध्ये घरांच्या जोत्यांचे अवशेष, राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याचा मूळ जोता, दगडी भिंती, तटबंदी, जुनी विहिर आणि एक प्राचीन तलाव यांचा समावेशा आहे. हे सारं आजही शिवकालीन सुवर्णयुगाची साक्ष देत उभे आहेत.
राजवाड्याचं जतन आणि संवर्धन करावं : राजमाता जिजाऊ यांचा वाडा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. मात्र, त्याची सध्या असलेली दुरवस्था पाहून इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिक यांना यातना होत आहेत. सरकार आणि पुरातत्त्व विभागानं याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्याचं जतन आणि संवर्धन करावं, अशी मागणी जोर धरत आहे.
राजवाड्याला किल्ल्यांप्रमाणं दर्जा मिळावा : स्वराज्याची राजधानी रायगड पाहण्यासाठी हजारो शिवभक्त येतात. रायगड पाहण्यासोबतच शिवभक्त राजमाता जिजाऊ यांची राजवाडा आणि समाधी पाहण्यासाठी येतात. परंतु पाचाडमधील राजमाता जिजाऊ यांचा राजवाडा पाहून शिवभक्त आणि स्थानिक नागरिक दु:खानं सांगतात ”गड, किल्ल्यांप्रमाणेच या वास्तूला देखील तीच प्रतिष्ठा, जपणूक आणि दर्जा मिळायला हवा. इतिहास फक्त पुस्तकातून नाही तर तो अशा वास्तूंमधून देखील अनुभवता येतो. पण त्यासाठी त्या वास्तू जपल्या पाहिजेत.” शिवप्रेमीनं सरकारकडं केली मागणी : ”राजमाता जिजाऊ यांचा राजवाडा ही केवळ एक वास्तू नाही, तर ती आपली अस्मिता आहे. या राजवाड्याचं संवर्धन केलं तर पुढच्या पिढ्यांना इतिहास समजेल. त्यामुळं सरकारनं याप्रकरणी तातडीनं लक्ष घालावं,” अशी मागणी राजवाडा बघण्यासाठी आलेल्या शिवभक्तानं केली.
