Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा बुधवारी (दि. 16) शेवटचा दिवस होता. त्यांच्यासाठी आयोजित निरोप समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत थेट एक राजकीय ऑफर दिली. ”आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही. मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे,” असे फडणवीस सभागृहात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वतुर्ळात वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारच्या टपल्या, टिचक्या, टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यांनी एखादा टोमणा, टपली, टिचकी मारली असेल ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेचे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देत आहे. आम्हाला खात्री आहे की, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल. त्यामुळे फडणवीस यांच्यासोबत शिवसेना म्हणून जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत, त्यांचा विचार फडणवीस यांना आधी करावा लागेल. आपल्यासोबत डुप्लिकेट ठेवायचे की असली ठेवायचे. सध्या तरी त्यांचा सर्व कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन सुरू आहे. डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस, डुप्लिकेट शिवसेना. त्यामुळे शिवसेनेचे सध्या चाललेले आहे ते उत्तम चाललेले आहे, असे त्यांनी म्हटले. 

ही वैचारिक दिवाळखोरी

संजय राऊत पुढे म्हणाले की, याला मी ऑफर म्हणत नाही. याला मी टपल्या, टिचक्या म्हणतो. देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेना आणि डुप्लिकेट राष्ट्रवादीसोबत सत्ता भोगत आहेत. त्याला कुठलाही वैचारिक किंवा नैतिक आधार नाही, असे असताना तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहात ही वैचारिक दिवाळखोरी आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.

राजकारण आणि बहुमत चंचल असतं

2029 सालापर्यंत आम्ही विरोधकांच्या बाकावर जायला स्कोप नाही. तुम्हाला इथे यायला स्कोप आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं. उद्या काय होईल ते सांगता येत नाही. देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना दबावाखाली येऊन दहशतवादाच्या विरोधात युद्ध थांबवतील असे कोणाला वाटले होते का? आम्हाला असे वाटले होते की, इतकी 56 इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर, कराची, इस्लामाबाद, बलुचिस्तानवर तिरंगा फडकावूनच गप्प बसेल. त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या अशाच होत्या. पण, काय झाले? आज त्या विषयावर आवाज बंद आहे. त्यामुळे राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही, असे त्यांनी म्हटले. 

ठाकरेंनी शिंदेंना मांडीवर घेऊन बसायला हवे होते का?

दरम्यान, काल फोटोसेशनच्या निमित्ताने सर्व नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच फ्रेममध्ये दिसले. पण, दोघेही नेते एकमेकांशी बोलले नाही. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसणे टाळले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना मांडीवर घेऊन बसायला हवे होते का? उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहे. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्या तोतया लोकांसोबत हस्तांदोलन करायचे का? महाराष्ट्राला हे आवडलं नसतं, असे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार

उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे. त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत. कालच काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांचा फोन होता. इंडिया आघाडीची बैठक व्हावी. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचे अनेक सदस्य अस्वस्थ आहेत. या सगळ्यांची एक बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणासंदर्भात एक दिशा ठरवणे गरजेचे आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडली होती. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहेत. इंडिया आघाडीची बैठक नक्कीच होत आहे आणि उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आम्ही जाहीर करू, अशी माहिती देखील त्यांनी संजय राऊत यांनी दिली आहे.