Spread the love

सातारा / महान कार्य वृत्तसेवा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 329 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर आहे. आज सकाळी कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडले गेल्याचं धरण व्यवस्थापनाने सांगितलं आहे.

धरणाचे दरवाजे आज उघडले : तीन दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. त्यामुळे कोयना, कृष्णा नद्यांची पाणीपातळी घटली होती. मात्र, सोमवारी पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवकही वाढली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 75 टीएमसी झाला आहे. पावसाचे अजून अडीच महिने बाकी आहेत. ही बाब लक्षात घेऊन धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.

कोयना धरण 71 टक्के भरलं : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 329 मिलीमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे सर्वाधिक 134 मिलीमीटर, कोयनानगरला 103 आणि महाबळेश्वरमध्ये 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धो धो बरसलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली असून, पाण्याची आवक 15,899 क्युसेकवर पोहोचली आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार, धरणात 75.48 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून, कोयना धरण 71 टक्के भरलं आहे. कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष (1 जून) सुरू झाल्यापासून आजअखेर कोयनानगरला सर्वाधिक 2330 मिलीमीटर, महाबळेश्वरला 2218 आणि नवजाला 2202 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिटमधून 2100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत : यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. त्यानंतर जून महिन्यात दमदार पाऊस झाल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पेरण्या, भात लावणी रखडली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खरीप पूर्व मशागतीही करता आल्या नाहीत. त्यामुळे यंदा खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत झाले.