ठाणे / महान कार्य वृत्तसेवा
रिक्षातून शाळेत निघालेल्या शाळकरी मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ उडाली. यावेळी शाळकरी मुलीनं स्वत:चा बचाव करण्यासाठी रिक्षाचालकाला कंपास पेटीतील करकटक मारत शेजारी बसलेल्या प्रवाशाला धक्का देत रिक्षातून उडी मारली. यानंतर मुलीनं घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी रिक्षा चालक असगर अली शाबीर अली शेख (35) याला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
रिक्षातून उडी मारत केली स्वत:ची सुटका : ”शहरातील फातिमानगर परिसरात राहणारी शाळकरी मुलगी 9 जुलैला दुपारी 12 च्या सुमारास रिक्षातून शाळेला जात होती. रामनगर इथल्या पाण्याच्या टाकीजवळ तिनं चालकाला रिक्षा थांबवायला सांगितलं. परंतु, रिक्षाचालकानं रिक्षा तिथं न थांबवता अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान दाखवत शाळकरी मुलीनं कंपास पेटीतील करकटक मारत शेजारी बसलेल्या प्रवाशाला धक्का देत रिक्षातून उडी मारत स्वत:ची सुटका केली. यानंतर ती शाळेत गेली,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
शाळेतून घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितला सगळा प्रकार : शाळेतून घरी आल्यानंतर शाळकरी मुलीनं आपल्यासोबत घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. यानंतर शुक्रवारी शाळकरी मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी शाळकरी मुलीनं सांगितलेल्या वर्णनानुसार रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. याच्या आधारे पोलिसांनी फातिमानगर परिसरात सापळा रचून रिक्षा चालकास अटक केली. सदर रिक्षाचालक त्याच परिसरात राहत असल्याचं तपास उघड झालं आहे. रिक्षाचालकाला न्यायालयीन कोठडी : फातिमानगर परिसरातून रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयानं रिक्षाचालकाला न्यायालयीन कोठडी सुनावली. रिक्षाचालकानं शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न का व कशासाठी केला? याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच पोलीस रिक्षाचालकाच्या साथीदाराचा शोध घेत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे, शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (प्रशा) विनोद पाटील, अतुल अड्डुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकर, उपनिरीक्षक कालु गवारी, हवालदार संतोष पवार, संतोष मोरे, दिनेश भुरकुड, किरण जाधव, रवि पाटील, गणेश कांबळे यांनी केली.
