मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
कतारवरुन भारतात आलेल्या अमली पदार्थ तस्कर महिलेकडून तब्बल सव्वा 6 किलो कोकेन पकडण्यात आलं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. या भारतीय महिला तस्कराकडून जप्त करण्यात आलेल्या या कोकेनची किंमत तब्बल 62 कोटी 6 लाख रुपये असल्याची माहिती डिआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. डीआरआयच्या मुंबई युनिटमधील अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या महिला तस्कराला रंगेहात पकडलं.
डीआरआयनं कसा रचला सापळा : कतार, दोहा इथून मुंबईला येणारी एक महिला अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती डिआरआयला खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीनुसार डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई विमानतळावर पहारा बसवला होता. भारतीय नागरिक असलेली ही महिला बाहेर येताच अधिकारऱ्यांनी तिला अडवलं. तिच्या सामानाची तपासणी केली असता, त्यात 6 ओरिओ बिस्कीटांचे बॉक्स आणि 3 चॉकलेटचे मोठे डब्बे सापडले. हे सामान उघडल्यावर या सर्व 9 बॉक्समध्ये कोकेन आढळून आलं. पांढऱ्या पावडरीनं भरलेल्या 300 छोट्या कॅप्सूलमध्ये हे कोकेन महिला सोबत घेऊन आली होती. कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 62 कोटी : या कोकेनची डिआरआय अधिकाऱ्यांनी जागीच फिल्ड टेस्ट किट वापरून चाचणी केली. तसेच सर्व कॅप्सूलची स्वतंत्र टेस्ट करण्यात आली. यावेळी या कॅप्सूलमध्ये कोकेन असल्याचं निष्पन्न झालं. या महिलेकडून एकूण 6 किलो 261 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 62 कोटी 6 लाख रूपये आहे. या महिलेला एनडीपीएस कायद्याखाली अटक करण्यात आली. डिआरआय याप्रकरणी अधिक तपास करत आहे. या महिलेला हे कोकेन कोणी दिलं?, ती ते पुढं कोणाला देणार होती?, यापूर्वी तिनं कितीवेळा अमली पदार्थांची तस्करी केलीय?, या सर्व बाबींचा तपास आता सुरू आहे. या तस्करीत देशातील आणि देशाबाहेरील अनेकांचा समावेश असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
