Spread the love

पुणे / महान कार्य वृत्तसेवा

शहराला लवकरच दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्याचा जागतिक स्तरावरचा संपर्क अधिक सुलभ होईल. तसेच, पुणे-मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावर सध्या निर्माणाधीन असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ जवळपास अर्धा तासानं कमी होणार आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांमधील वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते शनिवारी (12 जुलै) पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुस्तकाचं प्रकाशन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. तसेच त्यांच्या ’24 तास जनसंपर्क कार्यालय’ या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्धाटन आणि कोरोना काळातील अनुभवावर आधारित ‘प्रथम माणूस’या पुस्तकाचं प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, ” पुण्यासह नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. हे सर्व प्रकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असून, त्यामुळे उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे”.

मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचं कौतुक : तसेच, या कार्यक्रमात मुख्यमंर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं तोंडभरून कौतुक केलं. ”भाजपा हा नेहमीच कार्यकर्त्यांना वेगवेळ्या संधी देत असतो. पक्षात काम करणाऱ्यांची क्षमता पाहून त्याला संधी दिली जाते. खासदार मुरलीधर मोहोळ यांना जे काम दिले, ते त्यांनी प्रामाणिकपणाने केले,” संकटाच्या काळात जो इतरांच्या कामी येतो, तोच खरा नेता असतो, अशा शब्दात मुख्यमंर्त्यांनी मोहोळ यांच्या कामाचं कौतुक केले. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. ‘शिवरायांच्या किल्ल्यांसाठी पंतप्रधानांनी आणि मी प्रयत्न केले’ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने ‘जागतिक वारसा’च्या यादीत स्थान दिलं आहे. याविषयीही मुख्यमंर्त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ” स्वराज्यातील किल्ले हे जागतिक वारसा व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: प्रयत्न केले. या कमिटीत 20 देश आहेत. त्या सर्वांचे यावर एकमत होणं गरजेचं असतं. मतदान करताना या किल्ल्यांचा स्थापत्य शैलीचा विचार करण्यात आला. किल्ले बांधतांना माची पद्धत त्यांना वेगळी जाणवली. त्यामुळे सर्व देशांनी या किल्ल्यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे.”