Spread the love

नांदेड / महान कार्य वृत्तसेवा

आरोग्य विभागासाठी राज्य सरकार मोठा निधी खर्च करतो. परंतु, सर्वसामान्यांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाहीत. त्याचंच एक उदाहरण नांदेड जिल्ह्यातून समोर आले आहे. जिल्ह्यातील 22 वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाला. यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. परंतु, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं महिलेला रिक्षातून नेण्यात आलं. परंतु प्रसूती वेदना तीव झाल्यामुळं वाटेतच महिलेची प्रसूती झाली. त्यामुळं ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रस्त्यालगतच्या शेतामध्ये झाली महिलेची प्रसूती : नांदेड जिल्ह्यातील 22 वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यानंतर नातेवाईकांनी 108 क्रमांकाला फोन केला. परंतु, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं गरोदर महिलेला घेऊन नातेवाईकांनी रिक्षातून प्रवास केला. मात्र वाटेतच प्रसूती कळा वाढल्यामुळं महिलांनी रिक्षा रस्त्यातच थांबवली. यानंतर रस्त्यालगतच्या शेतात साडीचा आडोसा घेऊन गरोदर महिलेची प्रसूती करण्यात आली. यावेळी महिलेनं मुलाला जन्म दिला.

ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्य प्रश्न ऐरणीवर : 22 वर्षीय महिलेची रस्त्यालगतच्या शेतातमध्ये प्रसूती झाल्यामुळं आई आणि बाळाची नाळ तोडण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळं स्थानिक नागरिकांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत यानंतर आई आणि मुलाला मुखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आता बाळ आणि बाळाची आई सुखरुप आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. या सर्व प्रकारानंतर ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण मेथी या गावापासून येवती आणि होनवडज ही आरोग्य उपकेंद्र आहेत. परंतु, या आरोग्य उपकेंद्रात सुविधा नसल्यानं नागरिकांना आपत्कालीन वेळी अनेक समस्यांना सामारं जावं लागते. तसंच आरोग्य सेवेसाठी या भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागते असं भीषण चित्र इथे आहे.