आमदार सतेज पाटील : धनगर समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
वैचारिक प्रदूषणाविरूद्ध लढण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांचा विचार आणि संघर्ष प्रेरणादायी आहे. या प्रेरणेतूनच कार्यरत असलेल्या मल्हार सेनेने धनगर समाजातील गुणवंतांच्या पाठीवर दिलेली शाब्बासकीची थांब भावी पिढीला प्रेरणादायी अशीच आहे असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना युवक संघटना आणि अहिल्या महिला महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा चौक येथील राजश्री शाहू स्मारक भवन येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील यांच्या हस्ते दहावी, बारावी, कला क्रीडा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार पाटील पुढे म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे एक चांगल स्मारक कोल्हापूरमध्ये उभा करता आले याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळं भविष्यकाळात काय करायचं हे प्रेरणास्त्रोत आपल्याकडे आहे. हे येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी, धनगर समाज हा वाड्या वस्तीत विखुरलेला हा समाज आहे. शाळा लांब लांब अंतरावर असतात. त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी एसटी पास, सायकल देण्याचं काम शाशनाच्या आणि समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून होत आहे अशी माहिती त्यांनी दिली. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळं ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला त्यांनी दिला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे म्हणाले की, आमदार सतेज पाटील यांनी स्वखर्चातून कोल्हापूर मध्ये आणि देशातील तिसरा ऐतिहासिक असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा निर्माण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. मल्हार संघटनेविषयी बोलताना त्यांनी, १९९० पासून हा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. आजवर ज्या ज्यावेळी धनगर समाजावर अन्याय झाला त्यावेळी संघटना रस्त्यावर लढा देण्यात काम केलं आहे.
पणन महाराष्ट्र सर व्यवस्थापक सुभाष घुले, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बी एल हजारे यांची ही भाषणे झाली.
स्वागत व प्रस्ताविक मल्हार सेना जिल्हाप्रमुख व गोकुळ संचालक बयाजी शेळके यांनी केले. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, गडहिंग्लज माजी नगराध्यक्ष निरुपमा बन्ने, यशवंत बँकेचे संचालक बाबुराव रानगे, नितीन दलवाई, शेतकरी संघाचे संचालक राजसिंह शेळके, आनंदा बनकर शिवाजी विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे प्रमुख मच्छिंद्र गोपणे,उदय डांगे,मलकारी लवटे,जयवंत ताटे,डाॅ विजय गोरडे,बंडोपंत बरगाले,सुनिल एडगे,सचिन सलगर,रवी पाटील,प्रकाश येडगे, सोमाजी वाघमोडे बाळासाहेब दाईंगडे, लिंबाजी हजारे, बाबुराव बोडके,मारूती अनुसे,दिपक ठोंबरे,दत्ता बोडके आनंद डफडे,बबलु फाले शहाजी सिद मेघना गावडे यांच्यासह मल्हार सेना युवक संघटना व अहिल्या महिला महासंघ पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
आधुनिकतेचा योग्य वापर करा
आमदार पाटील म्हणाले की, सध्याच्या पिढी पुढं अनेक प्रलोभनं आहेत. त्यात सगळयात जास्त मोठं मोबाईल आणि इंटरनेट आहे. ते जितकं चांगलं तितकं वाईट आहे. त्याचा दुरुपयोग कसं थांबवता येईल यावर भविष्य टीकून आहे. कष्ट, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. ही प्रलोभलं दूर करून मन घट्ट करणं, संयम ठेवणं, स्टेबल माईंडनं विचार करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
