अमरावती / महान कार्य वृत्तसेवा
रहाटगाव येथील एस.ए. इंपेरियल बार अँड रेस्टॉरंटसमोर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत एक धक्कदायक घटना घडली आहे. रात्री बारमध्ये पाच मित्र सोबत दारू पित बसले होते. पहाटे 3:30 च्या सुमारास बारच्या बाहेर त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरून वाद झाला. या वादातून दोघांनी एका मित्राची चाकू भोसकून हत्या केली. राजकुमार तहलराम सुंदरानी (वय 52 रा. साई मंदिराजवळ, रामपुरी कॅम्प) असे घटनेतील ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
अशी आहे घटना : शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता राजकुमारचे मित्र शिवा फुलवानी (वय 42 रा.रामपुरी कॅम्प), बंटी पवार (वय 30 लोहार लाईन, विलास नगर) हे दोघेही दुचाकी वाहनाने घरी आले आणि नंतर राजकुमारला घेऊन ते बाहेर गेले. त्यानंतर काही वेळाने ते रहाटगाव येथील एस.ए.इंपेरियल बार अँड रेस्टोरेन्टमध्ये गेले. त्यावेळी आणखी दोन मित्र रवी तेजानी, अजय मेटानी आले. ते सर्वजण रामपुरी कॅम्प अमरावती येथे सोबत गेले आणि त्याठिकाणी सर्वांनी मद्यप्राशन आणि जेवण केलं. रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास राजकुमार सुंदरानी तसेच सर्व मित्र बाहेर आले. मध्यरात्री 3:30 वाजताच्या दरम्यान राजकुमार सुंदरानी आणि शिवा फुलवानी यांच्यात बाचाबाची झाली. बंटी पवार याने आपल्या खिशातून चाकू काढून तो शिवा फुलवानी याच्या हातात दिला. शिवा फुलवानी याने राजकुमार सुंदरानी यांच्या मांडीवर चाकूने वार केला आणि यानंतर दोघेही दुचाकीवरून तेथून पळून गेले. त्यामुळं प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळं राजकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यची माहिती, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी दिली.
पोलीस पोचले घटनास्थळी : घटनेची माहिती काही नागरिकांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजकुमार सुंदरानी यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली. त्यांनतर राजकुमार सुंदरानी यांचे मोठे भाऊ प्रकाश सुंदरानी यांनी बार समोरील सीसीटीव्ही फुटेज बघून नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. तर लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी सांगितले.
